मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज लोअर परळ येथील एन. एम. जोशी मार्ग येथे बांधण्यात येणाऱ्या ब्रीजची पाहणी केली. यावेळी त्यांनी ब्रीजचा पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस सुरु होईल व संपूर्ण पुलाचे काम १५ जुलैच्या आधी पूर्ण करण्याचे निर्देश, मुंबई महापालिका व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
लोअर परळ ब्रीजच्या पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोढा म्हणाले की, लोअर परळ पूल धोकादायक असल्याने तो बंद केल्यानंतर, या पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु मधल्या काळात काही कारणास्तव पुलाचे काम संथ गतीने सुरु होते. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या कामाने गती घेतली असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुलाच्या कामाची पाहणी करत असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी केली व यापूर्वी जे झाले ते झाले, ते सर्व बाजूला ठेऊन, नागरिकांसाठी वेळेत पूल सुरु करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.