विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

Santosh Gaikwad August 08, 2023 05:49 PM


मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाचा २०२३ चा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आज जाहीर झाला आहे. यंदा आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती असून ऑगस्ट महिन्यात महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. विजय वैद्य यांना प्रदान करण्यात येणार आहे.


मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार समितीची बैठक आज पत्रकार संघाचे अध्यक्ष  नरेंद्र वि. वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असता सर्वानुमते श्री. वैद्य यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री. विजय वैद्य ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रीय आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे ते तीनदा अध्यक्ष होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाचनालय संस्कृती वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार आहे.

आचार्य अत्रे यांचे नातू अ‍ॅड. राजेंद्र पै पुरस्कृत सदर पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशा स्वरुपाचा आहे.