बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष !

Santosh Gaikwad April 28, 2023 07:02 PM

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून बारसूत रिफायनरी प्रकल्पावरुन  मोठा संघर्ष सुरू आहे. रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. आज जमीन सर्वेक्षण केलं जात असतानाच  या सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी येथे हजारोच्या संख्येने आंदोलक पोहचल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करीत आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, मात्र कोणताही लाठीचार्ज केला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.  

 

बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन सध्या चांगलेच चिघळल्याचे दिसत आहे. महिला अधिक आक्रमक बारसू येथील महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला प्रकल्प नकोय. कोणीही प्रकल्पाची जबरदस्ती करु नये, असे सांगत महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. खासदार विनायक राऊत हे बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी मोर्चा काढणार होते. त्याचपूर्वी खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी थेट माती परीक्षण सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत पोलिसांचा विरोध जुगारून आक्रमक पवित्रा घेतला होता. यामध्ये आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही नागरिकांना दुखापत झाल्याचे देखील समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर माती परीक्षण तीन दिवसांसाठी थांबवा आम्ही चर्चेला तयार आहोत अशी भूमिका स्पष्ट करत आंदोलकांनी तीन दिवसांसाठी बारसू रिफायनरीच्या विरोधातील आंदोलन स्थगित केले आहे.


आंदोलकांवर लाठीचार्ज : संजय राऊत 


बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर करीत ट्विटद्वारे केला आहे. मुख्यमंत्री महोदय हे चित्र काळजी पूर्वक पहा. बारसु येथे झालेल्या निघृण लाठी हल्ल्याचे हे चित्र.आपण म्हणता लाठचार्ज झालाच नाही.अशी माहिती आपणास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची हिम्मत तुमच्यात आहे काय?शिवरायांचा महाराष्ट्र कोणाची गुलामी करतोय? उपमुख्यमंत्री मॉरिशस येथे भगवा फडकावयाला गेले आहेत म्हणे..आधी इथे भगव्यावर मराठी माणसांचे रक्त सांडत आहे ते पहा.. दलाल आणि उपरे यांच्या साठी मराठी डोकी फोड आहात. कोठे फेडाल हे पाप ? असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


कुठलाही लाठीचार्ज नाही : मुख्यमंत्री 


बारसू रिफायनरी प्रकल्प तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणारा आहे. म्हणून जवळपास 70 टक्के लोकांचं प्रकल्पाला समर्थन आहे. मात्र ज्यांचा विरोध आहेत त्यांना सरकारच्यावतीने प्रकल्पाची माहिती, फायदे, महत्व समजवून सांगितलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मी स्वत: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. आता तिथे शांतता आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही, अशी माहिती मला देण्यात आली. आंदोलनस्थळी काही लोक स्थानिक होते, मात्र बरेच लोक बाहेरचे होते, अशी माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करुन जबरदस्ती करुन हा प्रकल्प लादला जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.


विकासाला विरोध नाही पण पर्यावरणाचा -हास नको : अजित पवार 


विकासाला आमचा विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विकासकामामध्ये पॉझिटिव्ह राहिलेली आहे, सर्वेक्षण थांबवून स्थानिकांचे प्रश्न चर्चेतून सोडवावेत असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.  बेरोजगारी आणि महागाईमध्ये रोजगार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे यातून जर रोजगार येऊन आणि तिथे वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल तर स्थानिकांशी चर्चा करुन मार्ग काढायला हवा असेही  म्हणाले. 



काय आहे बारसू रिफायनरी प्रकल्प?

 

 २०१५ मध्ये, 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' प्रकल्प रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नाणारमध्ये बांधण्यात येणार होता. मात्र शिवसेना आणि स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. पुढे महाविकास आघाडीचे सरकार आपल्यानंतर हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू-सोलगावमध्ये  उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. या प्रकल्पामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 


स्थानिकांचा का विरोध 


या प्रकल्पला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. मागील पाच दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार. त्यांची फळझाडे नष्ट होतील, रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होईल, त्याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळेच स्थानिक नागरिक या प्रकल्पाला मोठा विरोध करत आहेत.