जिथे नाकारले, तिथेच सर्वोच्च पद, जीवन गौरव पुरस्कार सोहळ्या प्रसंगी डॉ. इंजि. अनिलकुमार गायकवाड यांनी दिला आठवणींना उजाळा

Santosh Gaikwad April 26, 2024 05:19 PM


मुंबईः सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही केवळ जलसंधारण विभागात कनिष्ठ अभियंता असल्याने मला सार्वजनिक बांधकाम विभागात घेतले नाही;परंतु या खात्यात यायचेच. असा निर्धार करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सकारात्मक प्रयत्न केले आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा दाखल झालो. समर्पित भावनेने कार्य करीत या खात्यात सर्वोच्च पद मिळाले असले, तरी त्यामागे मोठा संघर्ष आहे, असे मत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय  संचालक डॉ. इंजि.अनिलकुमार  गायकवाड य़ांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.

'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’, ‘अखिल भारतीय मुस्लिम विकास परिषद’, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’, अग्रसेन टाईम्स’, ‘विक्रांद टाईम्स’, ‘शारदा ट्रस्ट’, ‘शारदा पब्लिसिटी संकल्प फाउंडेशन’,‘पुरोगामी प्रकाशन’ आणि ‘गोल्डनपेज पब्लिकेशन’ या वृत्तपत्रीय तथा सामाजिक  संस्थांच्या वतीने डॉ. इंजि. अनिलकुमार गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी त्यांना भव्य अशी  संविधान उद्देशिकेची प्रतिमा तथा मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबऴे हे होते. या प्रसंगी  व्यासपीठावर ‘महानंद’चे संचालक कान्हुराज बगाटे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष एम. डी. शेख, तथा जेष्ठ पत्रकार अरुणकुमार मुंदडा,राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष  मुनाफ हकीम तसेच माजी जिल्हा माहिती अधिकारी युनूस आलम सिद्दकी उपस्थित होते.



सत्काराला उत्तर देताना आपल्या भावपूर्ण शब्दात डॉ. इंजि.अनिलकुमार गायकवाड म्हणाले, की जीवनात यश मिळत असते. तसेच अपयशही वाट्याला येत असते . कधी कधी तर न केलेल्या चुकांची शिक्षाही भोगावी लागते; परंतु चांगले कामच आपल्याला त्यातून बाहेर काढते. सार्वजनिक बांधकाम विभागात सातत्याने विशेष वेतनवाढ, राज्यपालांक़डून गौरव असे सन्मान वाट्याला येऊनही २०१५ ते २०१७ चा वाईट कालखंड आला. महाराष्ट्र सदन व अन्य़ प्रकारच्या गैरव्यवहारात संबंध नसताना नाव आले. निलंबित व्हावे लागले. ‘मी़डिया ट्रायल’ला सामोरे जावे लागले. कोणतीही माहिती न घेता परस्पर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. त्या वेळी कुटुंब कसे चालवले. हे माझे मला माहीत; परंतु चांगल्या कामाचे फळ मिळते. न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने बाजू ऐकून निर्दोषित्व बहाल केले. माझा संबंध नसताना मला त्यात गोवल्याचे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर एकाच वेळी मुख्य अभिय़ंत्यासह पाच पदे आणि सचिव दर्जाची दोन पदे अशा सात पदांचा कार्यभार माझ्याकडे होता.  

संघर्षमय  जीवनाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, की शाळेत दररोज आठ किलोमीटर जावे लागायचे आणि आठ किलोमीटर यावे लागायचे; परंतु कष्टाला कमी पडलो नाही. साडेसोळाव्या वर्षी तंत्रनिकेतनची पदविका मिळवली. कमी वय असल्या्मुळे नोकऱ्या करता येत नव्हत्या, तरीही त्याच काळात तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. इतक्या कमी वयात प्राध्यापक म्हणून काम करणारे विरळेच असतील.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे महानंदाचे संचालक कान्हूराज बगाटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, डॉक्टरांची प्रॅक्टिस लोक आजारी पडल्यावर चालते. भांडणे, मारामाऱ्या वाढल्या, की वकिली चालते. अभियंत्यांचे तसे नसते. तो समाज आणि राष्ट्राची बांधणी करीत असतो. देशाच्या पायाभूत सुविधांचा खऱ्य़ा अर्थाने पाया घातला गेला, तो मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्याच्या निर्मितीने. या रस्त्य़ासाठी भूसंपादन माझ्याकडे होते. हे अवघड काम मी सहा महिन्यात केले. ते पुढे म्हणाले कि,प्रत्येक धर्मांना जसे धर्म ग्रंथ आहे. तसेच देशाचा धर्म ग्रंथ संविधान आहे. आणि हाच देशाचा धर्म ग्रंथ प्रत्येक भारतीयाला सर्वोच्च असला पाहिजे. जीवन गौरव सोहळ्या प्रसंगी भव्य अशी संविधानाची उद्देशिका भेट दिल्या बद्दल अरुणकुमार मुंदडा यांचे कान्हूराज बगाटे यांनी विशेष कोतुक केले. व या पेक्षा अमूल्य भेट काही असू शकत नाही असे भावपूर्ण मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आपले वडील व गायकवाड यांचे वडील तसेच डॉ. इंजि.  अनिलकुमार गायकवाड आणि स्वतःतील साम्यस्थळे सांगितली. आपल्या शायराना शैलीतून त्यांनी  गायकवाड यांच्यामुळे राज्यातील रस्ते किती चांगले झाले, याचे दाखले दिले.

'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’ अध्यक्ष एम. डी. शेख यांनी गायकवाड यांच्यांशी आपली मैत्री कशी झाली आणि ते मित्रत्व कसे निभावतात, याची उदाहरणे सांगून रस्ते बांधणीतील त्यांच्या कामाला उजाळा दिला.

आपल्या प्रास्ताविकात डॉ. इंजि. अनिलकुमार गायकवा़ड यांच्या संघर्षाचा, त्यांच्या यशाचा आणि माणसातल्या देवत्वाचा उल्लेख अरुणकुमार मुंदडा यांनी केला.अनिलकुमारजी अधिकारी म्हणून मोठे आहेतच परंतु त्याही पेक्षा ते माणूस म्हणून अधिक मोठे असल्याचे दिसून येते असे प्रतिपादन मुंदडा यांनी आपल्या प्रास्ताविकेत केले.गायकवाड यांच्यावर अन्याय करणाऱ्यांनाही ते कशी चांगली वागणूक देतात आणि एकदा मैत्री झाली, की ते कशी निभावतात, याचे दाखले या प्रसंगी मुंदडा यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंजि. अनिलकुमार गायकवाड यांना सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक प्रमुख पत्रकार आणि सामाजिक संस्थांनी आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा गायकवाड यांच्या चिकाटी, समर्पण आणि आव्हानांचा सामना करताना लवचिकतेचा पुरावा होता.मुंबईतील हॉटेल रंग शारदा येथे आयोजित जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योगिक,वैद्यकीय,जनसेवा यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार तथा पुरोगामी प्रकाशनचे संस्थापक चांद शेख यांनी केले, तर साहित्यिक,प्रकाशक मिलिंद काटे यांनी मानपत्राचे वाचन केले.


शत्रूवरही प्रेम करा

कुणी आपल्याशी कसेही वागले, तरी आपण त्यांच्यांशी त्यांच्याप्रमाणे वागून चालत नाही. मग, त्यांच्या आणि आपल्या संस्कारात काय फरक राहिला, असा सवाल करून गायकवाड म्हणाले, की मला निलंबन करण्यात ज्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हात होता, त्यांना मी या मोठ्या पदावर आल्यानंतर भीती वाटली. मी त्यांच्यांशी सूड बुद्धीने वागेल, असे त्यांना वाटत होते; परंतु मी तसे केले नाही. उलट, त्यातील काहींना मी बढत्या दिल्या. सूड हा अन्याय परिमार्जनाचा मार्ग नव्हे, तर वाईटांशीही चांगले वागणे हा आपल्या संस्काराचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले