तब्बल 21दिवसांनी आदलाबदली झालेली बाळं आपापल्या मातांच्या कुशीत पुन्हा विसावली

Santosh Sakpal May 24, 2023 11:53 AM

डीएनए रिपोर्ट आला अन्… तूच माझं पिल्लू, मातांचा टाहो.. बाळांच्या आदलाबदलीत मातांचा 21 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही


जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे बाळांची अदलाबदल झाल्याच्या गैरसमजावर अखेर काल रात्री पडदा पडला. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर अखेर बाळांचे आईवडील कोण हे समजून आले. त्यामुळे दोन्ही बाळांना अखेर त्यांच्या मातांकडे देण्यात आले. तब्बल 21 दिवसाच्या तळमळ आणि तडफडीनंतर अखेर ही बाळं मूळ मातांच्या कुशीत विसावली. यावेळी दोन्ही माता भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 2 मे रोजी दोन गरोदर महिलांना अत्यवस्थ वाटल्यामुळे त्यांच्यावर सीजर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावेळी दोन्ही महिलांना झटके आले. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. यावेळी डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावून दोन्ही मातांचे जीव वाचविले. मात्र त्याचवेळी दोन्ही मातांची बाळं गैरसमजुतीमुळे एकमेकींना देण्यात आली होती. बाळांची आदलाबदली झाली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मातांना समजावून ती बाळं मूळ मातांना दिली, मात्र बाळांचे पालक समाधानी नव्हते. त्यांनी या बाळांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. आमची मुलं आम्हाला मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला.

पालकांची पोलिसात तक्रार

पालकांनी डीएनए चाचणीची मागणी केली होती. आपल्या बाळांची डीएनए चाचणी करावी आणि नंतरच आपल्याला आपली बाळं देण्यात यावी अशी मागणी करणारी तक्रार या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार दोन्ही माता आणि बाळ यांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्रलंबित होता.


ते 21 दिवस


तब्बल 21 दिवस हा अहवाल प्रतिक्षेत होता. या काळात या दोन्ही मातांची प्रचंड तगमग झाली. आपल्या बाळांसाठी त्या व्याकूळ झाल्या होत्या. काही वेळा त्यांना अश्रूही अनावर झाले होते. अखेर हा बहुप्रतिक्षित अहवाल मंगळवार 23 मे रोजी संध्याकाळी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. अनेक दिवसांपासून माता आणि बाळांची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तात्काळ बाळ मूळ मातांना सोपवण्याचा निर्णय घेतला.


पोलिसांसमोर बाळं दिली


त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर आणि रुग्णालय प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही मातांना त्यांच्या नातेवाईकांसह बोलवण्यात आले. त्यावेळी प्रभारी अधिष्ठाता तथा स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी डीएनए अहवाल वाचून दाखविला. अहवालानुसार सुवर्णा उमेश सोनवणे यांना मुलगी तर प्रतिभा प्रवीण भिल यांना मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही मातांना त्यांची बाळं सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे पालकांसह सर्वांनाच हायसे वाटले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.