दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असणे आवश्यक : एम़ व्ही. देशमुख

Santosh Gaikwad April 20, 2023 06:55 PM

मुंबई : मुंबईत अनेक जुन्या इमारती दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या आहेत. आग लागल्यानंतर त्याठिकाणी अग्निशमन वाहन पोहचू शकत नाही अशी अवस्था आहे. शहरी नियोजन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दोन इमारतींमध्ये मोकळी जागा असणे आवश्यक आहे. प्रकाश आणि हवा खेळती राहणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे प्रतिपादन फायर सेफ इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष,  अग्निशमन तज्ञ  एम. व्ही. देशमुख यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात आज केले.

अग्निशमन सप्ताह समारोपनिमित्त अग्निशमन अभियानांतर्गत मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार संघात  एम. व्ही. देशमुख यांचा वार्तालाप आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी एम व्ही देशमुख यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. यावेळी मंचावर पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर व सदस्य जयू भाटकर उपस्थित होते.

मुंबईत जागा शिल्लक नसताना इमारतीची पूर्नबांधणी करताना आजूबाजूला  ६ मीटर जागा सोडावी लागते ही अट का? या प्रश्नाला उत्तर देताना  देशमुख यांनी सांगितले की,  मुंबईची विकास नियंत्रण नियमावली ( डीसी रूल) आले. त्यामध्ये ही अट आहे.  इमारतीच्या आजूबाजूला अग्निशमन वाहन पोहचले पाहिजे हा त्या मागील उद्देश आहे. तसेच अग्निशमन दलाची हायड्रोलिक शिडी फिरण्यासाठी ९ मीटर जागा लागते. त्यामुळे ही जागा सोडणे क्रमप्राप्त आहे. शहरी नियोजन नसल्याने ही समस्या उद्भवत आहे, असे देशमुख यांनी सांगितले. पूर्वी मुंबईत प्लेगची साथ आली होती. खेळती हवा नाही हेच मुख्य कारण होतं. १९२४ मध्ये बीडीडी चाळी निर्माण झाल्या. त्या चार मजल्याच्या होत्या. त्यावेळी त्या इमारतींना दोन जिने होते आणि आजूबाजूला ९ ते १२ मीटर मोकळी जागा सोडण्यात आली होती. पूर्वी हे नियोजन होते. मात्र त्यानंतरच्या काळात शहरात नियोजन दिसून आले नाही, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.  

आग लागल्यानंतर जळून, भाजून मृत्यूचे  प्रमाण कमी असते. मात्र धुरामुळे अधिक मृत्यू होतात, असे देशमुख यांनी सांगितले. आग लागल्यानंतर सात ते आठ मजल्याच्या इमारती असतील तर जिन्यावरून खाली उतरू शकतो. मात्र १५ मीटरपर्यंत उंच इमारतींना दोन जीने असणे हा मापदंड आहे. गर्भवती महिला, वृध्द हे अनेकवेळा जिन्याने खाली येऊ शकत नाहीत. त्यावेळी लिफट असणे गरजेचे आहे. इमारतीच्या उंचीचा आणि अग्निशमन दलाच्या शिडीची काहीही संबध नाही. अमेरिकेत ४५ मीटरपेक्षा अधिक शिडीची उंची नाही. फायर लिफ्ट असणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी सांगितले. 

कोवीडमुळे रूग्णालयांना आगी लागण्याचे प्रकार घडले. क्षमतेपेक्षा जास्त पेशंट असल्याने तसेच यंत्रणेवर ताण वाढल्याने या आगी  लागल्या. फायर ऑडीट करणे हे महत्वाचे आहे. आता कायदा पारीत झाला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.  १५ ते २० टक्के आगी या शॉर्टसर्किटमुळे लागू शकतात. आगीचे कारण स्पष्ट होत नाही त्यावेळी आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जाते. इतर देशात फायर फॉरेन्सीक असतात. आगीचे नेमकं कारण सांगू शकतात. आपल्याकडे फायर फॉरेन्सीक नाही असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. राज्याचा अग्निशमन सल्लागार म्हणून काम करीत असताना अग्निशमन दलात अनेक सुधारणा कायदे आपण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी अग्निशमन कायदा नव्हता. तो करण्यात पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे.  सेवानिवृत्त झाल्यानंतरही फाऊंडेशनच्या माध्यमातून अग्निसुरक्षेबाबत लोकांमध्ये आपण जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्माराम नाटेकर यांनी आभार मानले.