गणेश विसर्जनासाठी महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज !

Santosh Gaikwad September 27, 2023 06:15 PM

 *ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी*

मुंबई : गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील १० दिवस मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव  मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.  गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अनंत चतुर्दशीला मुंबई महापालिकेने यंदाही जय्यत तयारी केली आहे.   गणेश विसर्जनासाठी  मुंबई महापालिकेचे १० हजार कर्मचारी तैनात असणार आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी ७१ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी १९८ कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 

मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांचा लोंढा येत असतो. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच, काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्यांवर ४६८ स्टीलच्या प्लेट टाकण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. समुद्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तांवर कोणताही दुर्दैवी प्रसंग येऊ नये तसेच नागरिकांच्या हितासाठी ७६४ जीवरक्षक मुंबई महापालिकेकडून तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेकडून ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. हार-फुले आणि इतर निर्माल्यासाठी १५०  निर्माल्य कलशांसह २८२ निर्माल्य वाहनांचीही सोय मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे.  तसेच मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ६०  निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ६८ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६१  रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर आणि उंच जागी सुमारे १०८३ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२१ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

 *गणेश विसर्जनासाठीची वेळेची नोंदणी करा...*

गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा करण्यात आली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या 8999-22-8999 क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ आणि मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


*गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात*

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि  शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी  राज्यातील गणेशभक्तांना केले आहे. गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घेतली तसेच एकूणच गणेश मंडळांनी देखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.  उत्सव साजरा करतांना आपल्याला स्वच्छतेचे महत्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे, वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी आणि चांगला संदेश द्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.


  *गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम आणि  फिरते तलाव उपलब्ध*  

 मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार आरे तलाव येथे सर्व प्रकारच्‍या गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्‍यात आली आहे. तथापि, नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत गणेश मूर्ती विसर्जनासाठी आरे तलाव येथे २ कृत्रिम तलावांची तर परिसरात ६ फिरत्या तलावांची उभारणी करण्‍यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.  उपायुक्त (परिमंडळ-४)  विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार ‘पी  दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्‍त  राजेश अक्रे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  मुंबई उच्‍च न्‍यायालयाने आरे तलाव येथे सर्व प्रकारच्‍या गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी घातली आहे. तथापि, नागरिकांच्‍या सोयीसाठी महानगरपालिकेच्‍या ‘पी  दक्षिण’ विभागाने आरे तलाव येथे २ कृत्रिम तलावांची  उभारणी केली आहे. तसेच, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आरे रोड नाक्‍यावर ४ फिरते तलाव, पिकनिक स्‍पॉट जवळ २ फिरते तलाव यांची उभारणी केली आहे. श्री गणेश मंडळांना या ठिकाणी ४ फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल. नागरिकांनी या कृत्रिम तलाव, फिरते तलाव या ठिकाणीच गणेश मूर्ती विसर्जित कराव्‍यात, असे आवाहनही राजेश अक्रे यांनी केले आहे.


*‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी बंद*

नाथालाल पारेक मार्ग, कॅप्टन प्रकास पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे.एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस. अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन.एम. जोशी मार्ग, बी. जे. मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलान आझाद रोड, बेलासिस रोड, मौलाना शौकत अली रोड, डॉक्टर बी. ए. रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल, 60 फिट रोड, मोहिम सायन लिंक रोड, टी.एच. कटारिय मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल.बी. एस.रस्ता, न्यू मिल रोड, संत रोहिदास मार्ग.

 
*रेल्वेकडून दहा विशेष लोकल ट्रेन*

मध्य रेल्वेकडून गणपती विसर्जनानिमित्ताने दहा विशेष लोकल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे गणपती विसर्जनाला जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासादायक बातमी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येथून हजारोच्या संख्येने नागरिक गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा आणि मढ येथे येतात. यामुळे विसर्जनानंतर गणेशभक्तांना रात्री उशिरा घरी पोहोचता यावे. यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईनच्या अप मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.40 वाजता कल्याणसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तर डाऊन मार्गावर रात्री 12.05 वाजता कल्याण-सीएसएमटीसाठी, 1 वाजता ठाण्याहून सीएसएमटी आणि रात्री 2 वाजता ठाण्याहून सीएसएमटीसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर लाईनच्या डाऊन मार्गावर रात्री 1.30 वाजता आणि 2.45 वाजता सीएसएमटी-बेलापूर, अप मार्गावरील रात्री 1.25 वाजता आणि 2.20 वाजता बेलापूर-सीएसएमटी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

 
*ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी*
 

 अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.  अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.