मुंबई - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त साद घालत जड अंत:करणाने लाखो गणेशक्तांनी आपल्या लाडक्या दैवताला, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला. चौपाट्या आणि कृत्रीम तलावामध्ये विसर्जनाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. विसर्जन शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. विसर्जनासाठी पालिकेने चोख व्यवस्था केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. खीर, मोदक नैवद्य झाला. सकाळ संध्याकाळ आरती झाली.
मंगळवारी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणरायाचे गणेशचतूदर्शीला आगमन झाले. आज दुस-या दिवशी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. अवघी मुंबई नगरी दीड दिवसांच्या मंगलमूर्तीच्या विसर्जन मिरवणूकांनी दुमदुमली होती. दुपारी चार वाजलेपासून दीड दिवसांचा पाहूणचार घेतलेल्या गणरायाच्या विसर्जन सोहळ्याला सुरूवात झाली. विसर्जन मिरवणूका वाजत गाजत सहकुटुंब निघाल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, या अशी आर्त साद घालत बाप्पाला निरोप देण्यात आला. पालिकेने विसर्जनासाठी विविध सोयी, सुविधा उपलब्ध केल्या होत्या. ६९ विसर्जन स्थळांवर आणि १९१ कृत्रिम तलावांमध्ये अत्यंत शिस्तबध्द आणि शांततेने विसर्जन झाले. यंदा १० ते १५ तलावांची वाढ करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी जीव रक्षकही तैनात केले होते.
विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालिकेच्या चोवीस प्रशासकीय विभागांच्या स्तरावर नियंत्रण कक्ष, प्रमुख विसर्जन स्थळी जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे मोटार बोट व जर्मन तराफे, सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी स्वागत कक्ष, अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार हून अधिक फ्लड लाईट व सर्च लाईटची व्यवस्था, महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आले आहेत.
निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ हून अधिक निर्माल्य कलश व निर्माल्य वाहने, अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी निरिक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे तसेच महत्त्वाच्या विसर्जन स्थळी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.ज्या विभागात विसर्जन स्थळे जवळपास नाहीत, शिवाय रस्ते अरुंद आहेत अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने यंदा १५ फिरती विसर्जनस्थळे उपलब्ध करण्यात आली होती. त्यातही काही मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.