मैत्रीची नवी परिभाषा सांगणार ‘गुड वाईब्स ॲान्ली’ २७ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर

Santosh Sakpal July 21, 2023 10:49 PM

काही दिवसांपूर्वीच  ‘गुड वाईब्स ॲान्ली’ या बेवफिल्मचे पोस्टर झळकले. पोस्टर पाहून यात काहीतरी भन्नाट आहे, याची कल्पना आली होतीच. त्यात आता भर टाकली आहे या वेबफिल्मच्या ट्रेलरने. नुकतेच या ‘गुड वाईब्स ॲान्ली’चे ट्रेलर प्रदर्शित झाले असून ट्रेलरही अफलातून आहे. श्रवण अजय बने आणि आरती केळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हलक्याफुलक्या, मनाला आनंद देणाऱ्या वेबफिल्मची कथा आणि दिग्दर्शन जुगल राजा यांचे आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत या वेबफिल्मचे निर्माते जुगल राजा असून येत्या २७ जुलैपासून ‘गुड वाईब्स ॲान्ली’ प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे. 

दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सर्फिंग कॅम्पच्या निमित्ताने एकत्र येतात. सुरूवातीला सतत खटके उडणाऱ्या या दोघांमध्ये हळूहळू मैत्री निर्माण होताना दिसत आहे. अतिशय सुरेख अशा या मैत्रीत धमाल आहे. भावनिक बंध आहेत. सर्फिंग या वॅाटर स्पोर्टभोवती फिरणाऱ्या या कथेत मैत्रीची एक तरल भावना अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे ट्रेलरमध्ये दिसतेय. आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी या वेबफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ मैत्री या विषय यापूर्वी अनेकदा हाताळण्यात आला आहे. मात्र एखाद्या खेळातून फुलत जाणारी मैत्री बहुदा पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शकांनी खूप छान पद्धताने हा विषय हाताळला आहे आणि मांडला आहे. तरूणाईला हा विषय निश्चितच आवडेल. त्याचबरोबर सर्वच वयोगटाला ही वेबफिल्म आवडणारी आहे.’’ तर दिग्दर्शक जुगल राजा म्हणतात, ‘’या वेबफिल्मची कथा खूप साधी सरळ आहे. एक समंजस, मनाने हळवी तरीही खंबीर अशी विवाहीत मुलगी आणि एक मस्तीखोर, गांभीर्य नसलेला मुलगा यांच्यात एका खेळाच्या माध्यमातून हळुवार खुलत जाणारी मैत्री, अशी या कथेची संकल्पना आहे. ही एक भावनिक वेबफिल्म आहे.’’