नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे रोपण !
Santosh Gaikwad
October 24, 2023 04:55 PM
भगवान गौतम बुद्धांचे विचार जगाला वाचवू शकतात : छगन भुजबळ
*नाशिक :-* भगवान गौतम बुद्धांनी आपल्या उपदेशांनी लोकांच्या जीवनात प्रकाश आणला, लोकांची वैचारिक क्षमता विकसित केली. लोकांच्या हृदयात दयाभाव, करूणा निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. गौतम बुद्धांनी शिकवण आणि विचार आजची तितकेच प्रेरक असून प्रत्येकाने ते विचार स्वतः आत्मसाद करून समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आज जगात विविध देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशावेळी भगवान गौतम बुद्धांचे विचार जगात शांतता निर्माण करून या जगाला वाचवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.
महाराष्ट्र शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे ऐतिहासिक महाबोधी वृक्ष रोपण सोहळा पार पडला. या आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्यास श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायक, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री गिरीश महाजन,श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्यनीय भिक्खू नाराणपणावे, पूज्यनीय भिक्खू डॉ.पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवीर, आमदार राहुल ढिकले,आमदार प्रा.देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे,माजी खासदार समीर भुजबळ,माजी आमदार पंकज भुजबळ,शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशासक तथा मनपा आयुक्त अशोक करंजकर, बार्टी महासंचालक सुनिल वारे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,समन्वयक आनंद सोनवणे,शहराध्यक्ष रंजन ठाकरे,बाळासाहेब कर्डक,प्रकाश लोंढे, संजय खैरनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दसऱ्याला आपण आपट्याची पान वाटून सोन लुटत असतो आज मात्र आपण भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचं सोंन लुटण्यासाठी येथे आलोय. नाशिक शहराला धार्मिक अस महत्व असून जगभरातील लोक येथे येत असतात. आता बोधीवृक्ष ही नाशिक आणि महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य अशी भेट असून जागतिक स्थरावर नाशिकच्या वैभवात अधिक भर पडणार आहे. यामुळे नाशिकच्या पर्यटनात मोठी वाढ होऊन या स्थळाला जागतिक महत्त्व प्राप्त होणार आहे. यापुढील काळात या वृक्षाचे संरक्षण करून परिसराचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे. अगदी लहान बाळाप्रमाणे याची काळजी घेऊन या झाडाची वाढ करण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. याठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून भिक्खू निवास यासह विविध विकासकामे करण्यात येतील. तसेच यापुढील काळातही विकासाची अनेक कामे करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोर गरीब समाजावर होत असलेले अत्याचार बघून येवल्यातील मुक्तिभुमिवर धर्मांतराची घोषणा केली. आजच्या या विजया दशमीच्या दिवशी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. अनेकांनी आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शस्त्र हातात घेतली. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठलंही शस्त्र हातात न घेता रक्ताचा एक थेंबही सांडविता एकाच वेळी करोडो लोकांचे बौद्ध धर्मात धर्मांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महाबोधी हे एक पवित्र वृक्ष आहे. हा गौतम बुद्धाचा सर्वात जवळचा अस्सल जिवंत दुवा आहे. महाबोधीवृक्ष हा ज्ञानाचा वृक्ष आहे. सुमारे २६०० वर्षांपूर्वी, भगवान गौतम बुद्ध भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या इसाथु वृक्षासमोर पाठीशी बसले होते. या क्षणी, जेव्हा ते झाडाच्या विरूद्ध बसले, तेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. ते बोधीवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आणि बुद्धाच्या हयातीतही यात्रेकरू ते पाहण्यासाठी आले येत होते.
नंतर, बौद्ध संघमित्रा महाथेरी यांना सम्राट अशोकाने भारतातून श्रीलंकेत पाठवले. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथील रॉयल पार्कमध्ये बोधी वृक्षाची शाखा लावली. ते महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते. तेव्हापासून बौद्ध भिक्षू आणि समर्पित राजांनी त्यांची काळजी घेतली आणि संरक्षित केली. आज या महाबोधी वृक्षाच्या फांदीचे आपल्या नाशिकमध्ये रोपण करण्यात येत आहे. ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.