घरगुती LPG सिलेंडरच्या दरात १०० रूपयांनी कपात : महिलादिनी मोदी सरकारची घोषण !

Santosh Gaikwad March 08, 2024 10:01 AM

 
नवी दिल्ली :  जागतिक महिला दिनी मोदी सरकारने महिलांना गिफ्ट दिले आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात शंभर रूपयांची कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वरून एलपीजी सिलेंडरच्या किंमती १०० रूपयांची स्वस्त केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केल्याचे दिसून येतय.  

गेल्या काही वर्षांत सिलेंडरचे भाव दुप्पटीहून अधिक झाले.  काही वर्षांपूर्वी ५०० रूपयांच्या आत मिळणारा सिलेंडर काही महिन्यांपूर्वी ११०० रुपयांच्या घरात पोहचला होता. त्यामुळे मोदी सरकारविषयी ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली हेाती. त्यामुळे दिवाळीच्या आसपास केंद्र सरकारने २०० रूपयांची सबसिडी देत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. वाढती महागाई आणि सिलेंडरचे वाढते भाव यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

घरगुती सिलेंडरच्या दरात १०० रूपयांची कपात केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून केली आहे. मोदी म्हणाले, आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १०० रूपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसहृय होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं आरोग्यही सुधारेल असे मोदी यांनी एक्सवर म्हटले आहे.