विधानसभेची हंडी महायुती फोडणार : मुख्यमंत्री

Santosh Gaikwad August 27, 2024 08:16 PM

 
 ठाणे : आमच्या सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता लाडका गोविंदा अशा योजना आणल्या. परंतु या योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले असून यामुळे ते सातत्याने आरोप करत आहेत, त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केला.

ठाण्यात टेंभी नाका मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी​   दिघे साहेबांची दहीहंडी मानाची हंडीचे आयोजन करण्यात आले होते.  या उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावत गोविंदांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. विरोधकांनी कतीही आरोप केले, कितीही रडगाणे केले, तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव हे निर्बंधमुक्त केले. गोविंदा आता प्रो गोविंदा केला, त्यांचा विमा काढला. प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.

माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी त्यानंतर आता गोविंदाही आमचा लाडका आहे असे नमूद केले. त्यासाठीच गोविंदा खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला, गोविंदांना विमा कवच, दहीहंडीच्या दिवशी सुट्टी, तसेच प्रो-गोविंदा सुरु केला असे मुख्यमंत्री म्हणाले .