मन की बात गौरवगीताचा ‘मराठी सूर'
Santosh Sakpal
May 18, 2023 01:10 AM
MUMBAI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाच्या अभिनव आणि कलात्मक पद्धतीने सादर होणाऱ्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाने गेल्या काही वर्षांत लोकप्रियतेचे नवे उच्चांक निर्माण केले असून यातून पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्यात विलक्षण नाते तयार झाले आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०१ वा भाग २८ मे ला प्रसारित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १०० भागांचा गौरव आणि १०१ व्या भागाचे स्वागत करणारे ‘मन की बात गौरवगीत’ समोर आले आहे. जनतेच्या भावनेचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या या कार्यक्रमाच्या गौरवगीताचा सूर सध्या सर्वत्र घुमतो आहे.
सौ भागो की सुंदर माला भारत माँ के चरणों मे
एक सौ एक वी मन की बात का स्वागत है हर घर घर मे ....
मन की बात ये जन की बात ये देश की बात है ....
ये बात है सूनहरी राष्ट्रहित से भरी भरी ...
असे बोल असणारे गीत प्रत्येकाच्या मनाला भिडेल असा विश्वास या गीताचे गीतकार-संगीतकार संजय गीते यांनी व्यक्त केला. अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना समोर आणणाऱ्या कार्यक्रमाच्या गौरवगीतातून समाजातील ‘रिअल हिरो ना मानाचा मुजरा करण्यात आला आहे. पतंप्रधान मोदींचा आठ वर्ष सुरू असलेला रेडिओ प्रोग्रॅम, त्याचे सातत्य, मान्यवरांची यशोगाथा या साऱ्याचे प्रतिबिंब या गौरवगीतात दिसते आहे. प्रेरणादायी संगीत, वेगवान बिट्स आणि अचूक शब्दांमुळे हे गौरवगीत एक मोटिवेशन गीत ठरत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये या गीताचे स्क्रीनिंग शो संपन्न होत आहेत.
या गौरवगीताची गीत-संगीत-संकल्पना संजय गीते यांची असून या गीताला गायिका श्रावणी गीते, संजय गीते यांचा स्वरसाज लाभला आहे. ध्वनिमुद्रण सुमंतजी तर व्हिडिओची जबाबदारी सुमंत वैद्य, वरुण कदम यांनी सांभाळली आहे. भाजपा नाशिकचे श्री.गणेश गीते या गीत निर्मितीचे प्रायोजक आहेत. सोर्स म्युझिक स्टुडिओने या गौरवगीताची प्रस्तुती केली आहे.
मराठी सिनेसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून उत्तम कामगिरी करताना अनेक नाटक मालिका सिनेमाचे संगीत दिग्दर्शन संजय गीते ह्यांनी केले आहे. स्व.लता मंगेशकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर अशा अनेक दिग्गजांसोबत काम करताना कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर यांच्या कवितांना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून करमणुकीसोबत प्रबोधन व्हावे आणि समाजातील तणावग्रस्त घटकांना सशक्त करावे यासाठी त्यांनी सुरू केलेले मनशक्ती संगीताचे यशस्वी प्रयोग ते गेली दहा वर्ष सातत्याने करीत आहेत. अशा या प्रयोगशील संगीतकार गायकाने 'मन की बात' गौरवगीतातून वेगळा प्रयत्न केला असून रसिकांना तो नक्कीच भावेल यात शंका नाही.