मनसेचे टोलनाक्यावर खळखट्याक स्टाईलने आंदोलन

Santosh Gaikwad August 13, 2024 12:18 AM



नागपूर : मनसेने टोलनाक्यावर खळखट्याक स्टाईलने आंदोलन केल्याची घटना नागपुरात घडली.    शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी ५ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर १० किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत. या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, वाणिज्यीक वाहनांकडून (माल वाहतूक करणारे वाहन) टोल वसुल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेनं आज येथील टोलनाक्यावर जाऊन खळ खट्याक स्टाईलने आंदोलन केले.

दरम्यान, राज्यात मनसे पुन्हा एकदा आक्रमक शैलीत परतली असून काही दिवसांपूर्वी अकोला येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या होत्या. त्यानंतर, ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी त्यांच्या कारवर नारळ आणि शेण फेकल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रत्त्युत्तराची पाठराखण करत, जसाश तसे उत्तर दिलं जाईल, असे म्हटलं आहे. त्यामुळे, आता मनसैनिक निवडणुकांच्या अगोदरच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, नागपूरजवळ आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर तोडफोड करुन खळखट्याक आंदोलनाची आठवण करुन दिली आहे.