मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी
Santosh Gaikwad
July 17, 2024 09:32 PM
मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, कवयित्री नीरजा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २० जुलै, २०२४ रोजी होत आहे. ९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे आणि कवयित्री नीरजा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान कऱण्यात येतील. साहित्यप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आझाद मैदान येथील पत्रकार भवनात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या समारंभात, २०२३ चा एक लाख रुपये रकमेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 'दीपावली' अंकासाठी देण्यात येणार आहे. ऋतुरंग, पद्मगंधा, अक्षरदान, वयम, हंस, चंद्रकांत, सृजन आणि इतर अंकांचांही या वेळी विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येईल. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष मा. आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.
सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे.
राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी तर रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक म्हणून संघाचे ज्येष्ठ सदस्य दिपक म्हात्रे यांनी काम पाहिले.
राज्यस्तरीय निकाल पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक – दीपावली (प्रथम पारितोषिक, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह)
ऋतुरंग (द्वितीय पारितोषिक, पन्नास हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
पद्मगंधा (तृतीय पारितोषिक, तीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
सर्वोत्कृष्ट विशेषांक – अक्षरदान, पुणे (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक - वयम (७५०० रुपये आणि सन्मान चिन्ह), उत्तेजनार्थ - धमाल मस्ती
उत्कृष्ट दिवाळी अंक – हंस (१५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट कथा – इनसायडर, लेखक – पंकज कुरुलकर, युगांतर दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट कविता – कवयित्री – संगीता बर्वे, मौज दिवाळी अंक (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट मुखपृष्ठ – किरण हणमशेट (चंद्रकांत दिवाळी अंक) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट व्यंगचित्रे – घन:शाम देशमुख (धमाल धमाका दिवाळी अंक) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
याशिवाय, सर्वोत्कृष्ट लेख (अनिल पाटील, चंद्रकांत दिवाळी अंक), लक्षवेधी परिसंवाद (AI चे जग, अक्षर दिवाळी अंक), लक्षवेधी मुलाखत (डॉ. राजुरकर, संवादक – डॉ. विजय पांढरीपांडे, लय भारी दिवाळी अंक) अशी निवड परिक्षकांनी केली आहे.
रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक – सृजन (प्रथम पारितोषिक, चाळीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
शब्द संवाद (द्वितीय पारितोषिक, वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
साहित्य आभा (तृतीय पारितोषिक, दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्तेजनार्थ – आगरी दर्पण, किल्ले रायगड (प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट कथा – आसक्या, प्रा. राजेंद्र सोनवणे (साहित्यविश्व) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट कविता – कोण असे तू, विजय इंद्रकेशव (इंद्रधनू) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
उत्कृष्ट व्यंगचित्रकार – विवेक मेहेत्रे (साहित्य आभा) (३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह.)