९६ हजारांच्या फोनसाठी तलावातून २१ लाख लीटर पाणी गटारात फेकले; अधिकाऱ्यावर केली ‘ही’ कारवाई; नेमकं प्रकरण काय?
Santosh Sakpal
May 27, 2023 08:59 AM
छत्तीसगढ : एकीकडे पाण्यासाठी त्राही त्राही माजली असताना दुसरीकडे एक सरकारी बाबू स्वत:चा 96 हजांराचा मोबाईल तलावाच्या पाण्यात पडला म्हणू संपुर्ण तलावालाच उपडा करण्यासाठी त्या तलावातील तब्बल 21 लाख लिटर पाणी रस्त्यावर फेकून देतो. त्यासाठी या सरकारी बाबूने सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांची वर्क आर्डर काढली.
छत्तीसगढ येथील कांकेर जिल्ह्यातील पखांपूरमध्ये एक अन्न पुरवठा निरीक्षकाचा मोबाईल फोन तलावात पडला होता. यासाठी या अधिकाऱ्याने ४ दिवस तलावातून लाखो लीटर पाण्याचा उपसा केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, उपसा करण्यात आलेल्या पाण्याची रक्कम अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
पखांपूरमधील अन्न पुरवठा निरीक्षक राजेश विश्वास २१ मे रोजी आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी परालकोट जलाशय येथे गेले होते. तेव्हा राजेश विश्वास यांचा मोबाईल फोन तलावात पडला. अधिकाऱ्याने मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी ३० एचपीच्या दोन मोटरने ४ दिवस २१ लाख लीटर पाण्याचा तलावातून उपसा केला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजेश विश्वास यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, तीन दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, राजेश विश्वास यांना जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी आरसी धिवार यांनी पाणी उपसण्यासाठी तोंडी परवानगी दिल्याचं समोर आलं. याबाबतही जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी आरसी धिवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
धिवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीशीत सांगितलं की, “राजेश विश्वास यांनी प्रसारमाध्यमांत दिलेल्या निवेदनात आरसी धिवार यांच्याकडं तोंडी परवानगी मागितली. पण, वरिष्ठांची परवानगी न घेता धिवार यांनी तोंडी परवानगी दिली. त्यांनी गैरवर्तन केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.”