राहुल नार्वेकरांचा निकाल : अजित पवारांचा खरा राष्ट्रवादी पक्ष, दोन्ही गटाचे आमदार पात्र
Santosh Gaikwad
February 15, 2024 06:44 PM
मुंबई : विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष (खरी राष्ट्रवादी) आहे. असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटातील आमदार पात्र ठरविण्यात आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीच्या निकालाचे वाचन आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले त्यावेळी नार्वेकर यांनी खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच असल्याचं म्हटलं आहे. नार्वेकर म्हणाले आहेत की, ''विधिमंडळ बहुमतावर खरा पक्ष कोणाचा? हे ठरवता येऊ शकत नाही. प्रत्येक गटाचं बहुमत महत्त्वाचं आहे. अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा होता. शरद पवार गटाने 41 आमदारांविरोधात अपात्र याचिका दाखल केली होती. यातच अजित पवार यांना अधिक पाठिंबा होता. विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष (खरी राष्ट्रवादी) आहे.
नार्वेकर म्हणाले, 30 जून नुसार अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. असं असलं तरी अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही. 29 जूनपर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आक्षेप घेतला नव्हता. 30 जून रोजी शरद पवार आणि अजित पवार या दोघांकडून आपण पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही गटाने राष्ट्रवादी घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत, असा दावा केला आहे.
ते म्हणाले, शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष (खरी राष्ट्रवादी) असल्याचा निकाल त्यांनी दिला आहे.