शिवसेना फोडली तशीच राष्ट्रवादी फोडण्याचे षडयंत्र : संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप
Santosh Gaikwad
April 17, 2023 07:31 PM
मुंबई : 'ज्या पद्धतीने शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु' असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटयावर असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. मात्र अजित पवार हे भाजपमध्ये जाणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, 'ईडी, सीबीआय, पोलिस यंत्रणा, सर्व तपास यंत्रणा यांचा दुरुपयोग करून आणि दबाव टाकून शिवसेना तोडण्यात आली आणि हे सरकार बनवण्यात आले. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली गेली. तसंच राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'पवार साहेबांचे असं म्हणणं आहे जे आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं की या दबावामुळे जर कोणी बाहेर पडणार असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. तो पक्षाचा निर्णय नाही. पक्ष म्हणून एनसीपी हा भाजपसोबत कधीच जाणार नाही. तो महाविकास आघाडीचाच घटक असेल. हे पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी हे उद्धव ठाकरेंना देखील सांगितले आहे.', असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 'शिवसेनेच्या नेत्यांना केला त्याच प्रकारचा दबाव एनसीपी सोडण्यासाठी केला जात आहे. काही आमदारांवर काही प्रकरणं सुरु आहेत. त्याच्यावर धाडी घालणं, त्यांच्या कुटुंबांना धमकावणे असे प्रकार एनसीपीच्या नेत्यांच्या बाबतीत आणि आमदारांच्या बाबतीत होत आहे. त्यांना सांगितले जात आहे की एनसीपी सोडा आणि भाजपला पाठिंबा द्या.', असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यावर भाजपने कितीही दबाव आणला तरी सुध्दा ते भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत. तर बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार हे भाजपच्या वाटयावर असल्याच्या चर्चा मी सुद्धा ऐकत आहे. पण, वस्तुस्थितीत तसं काही वाटत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. तेव्हा सोडून जाण्याचा कोण कशाला विचार करेल असेही थोरात म्हणाले.