प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या 'सरी' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

Santosh Sakpal May 07, 2023 06:14 PM

अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर यांच्या मुख्य भूमिका असलेला फ्रेश 'सरी'ची सोशल मिडियावरही हवा


मुंबई, आयुष्य कधीतरी एका अशा वळणावर येते, जिथे पुढे काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की, 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स'. याच आशयाचा 'सरी' हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सर्वस्तरातील प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत असून सर्व चित्रपटगृहात 'सरी' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच सोशल मिडियावरही 'सरी' ची जोरदार हवा निर्माण झाली आहे. 

कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन अशोका के. एस. यांनी केले असून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर 'सरी'च्या निमित्ताने मराठीत पदार्पण केले आहे.  या चित्रपटाचे संगीत 'कांतारा' चित्रपटाला ज्याचं संगीत लाभलं आहे, त्या बी. अजनीश लोकनाथ आणि सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी दिले आहे.

प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन. जणू स्वर्गात बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच. पण क्षणात त्यांच्या आयुष्यात तिसरा आला तर? अशी अकल्पित प्रेमकथा असलेला, प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर प्रमुख भूमिकेत आहेत. तर मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांनीही महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. 

अभिनेत्री रितिका श्रोत्रीची बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. मात्र 'सरी' चित्रपटात रितिका श्रोत्री एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार असून आजवरच्या भूमिकेपेक्षा ही तिची खूपच वेगळी भूमिका आहे. सोज्वळ, अभ्यासू आणि रोमँटिक 'दिया'चा हा अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे. मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत मोठ्या पडद्यांवरही रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरला आहे.  दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वी अंबर ने आपल्या पहिल्या मराठी चित्रपटात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

चित्रपटाबद्दल सांगायचं तर ही एक प्रेमकहाणी आहे. प्रेमात पडलेल्या तरुणतरुणींच्या आयुष्यात अनेक वळणे येतात, अनेक आश्चर्यकारक घटना घडतात, चमत्कार घडतात, ज्यांचा कधी कोणी विचारही केलेला नसतो. मनाला भिडणारी ही कथा आहे दिया म्हणजेच रितिका श्रोत्रीची.  दोन मुलांसोबत मैत्री होते, ती दोघांच्याही प्रेमात पडते, पण शेवटी असे काय होते, ज्यामुळे दिया स्वतःला दुखावून घेते? तिच्या आयुष्यात ते दोघे कसे येतात? त्या दोघांपैकी ती कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि या प्रेमकथेचा शेवट काय होणार?  आदि प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'सरी' चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.