MUMBAI/NHI
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं दुसरं घर. जिथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो. ज्ञानाचे आदान - प्रदान होते म्हणूनच शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया ठरतो. आयुष्याची जडणघडण येथेच होते. शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो, अशाच सर्व गोष्टी आणि त्यासोबत एक सशक्त संदेश देणारा अखिल देसाई लिखित, दिग्दर्शित 'शिष्यवृत्ती' चित्रपट १५ मार्चपासून प्रदर्शित होत आहे.
सिनेमात थ्री इडियट फेम सेंटीमीटर दुष्यंत वाघ, निकिता पाटील, कमलेश सावंत, रुद्र ढोरे, अंशुमन विचारे, उदय सबनीस आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निसर्गरम्य अशा कोकणात एक सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे.
ही गोष्ट आहे, कोकणात राहणाऱ्या राजुची. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याला शिकवणाऱ्या त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाची. शाळेत नव्याने रुजू झालेल्या गावडे गावडे सरांच्या येण्याने राजूचे शालेय जीवन संपूर्णपणे बदलून जाते. सरांच्या शिकवणीत राजू जीवनातील काही मोठे धडे शिकायला लागतो. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ सर्वांना हवाच असतो. आपल्या शालेय जीवनातील अनेक गोष्टी या सिनेमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. गुरू-शिष्य यांचे भावविश्व, शिक्षकांचा व्यवहार आणि बरंच काही. अखेर राजूला शिष्यवृत्ती मिळते का? त्याचे पुढे काय होते? राजूचे कुटुंब आणि शिक्षक यांचे काय होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या सिनेमात बघायला मिळतील.