महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी : पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Santosh Gaikwad June 14, 2023 03:11 PM

  मुंबई, दि.१४ :  छत्रपती शिवरायांच्या  प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क व उभारणार आहे यासर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून  एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


  मंत्रालय दालन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.मंत्री  लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य सरकार व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो.हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांचा इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे.शिवसृष्टी च्या कामाबाबत  जनतेच्या आलेल्या सुचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल.तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल.


 शिवनेरी येथे   छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे.,बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय,छत्रपती संभाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय,नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय,रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.


 या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्यांचा अनुभवता येईल.


   *थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम*

 भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क साठी १५ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकरजींचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल.कार्ला - आचार्य चाणक्य म्युझिअमसाठी ७५ कोटी रूपये तर आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती अर्थनीती सामाजिक नीती युद्ध नीती, धर्म निती व याचसोबत ७   दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तां करीता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे  निवासाची व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.


 *प्रत्येक शाळा व महाविदयालयात युवा पर्यटन क्लब*

 नव्या पिढीला पर्यटन स्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे.प्रत्येक शाळा व महाविद्यालयानजीक असलेल्या पर्यटन स्थळांचे जतन करावे  स्थानिक ठिकाणी  जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


*अंगणवाडी स्तरावर ही साजरा केला जाणार योग दिवस*

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, २१ जुन हा जगभरात “आंतरराष्ट्रीय  योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्व अनन्य साधारण आहे. राज्यातील सर्व सामान्य व्यक्तिपर्यंत विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वृध्दींगत व्हावी यासाठी प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन “अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.

****