सलमान खान हा देशातील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा चित्रपट म्हणजे यशाची शंभर टक्के हमी. बॉक्स ऑफिसवर किमान 300 कोटींचा आकडा पार करण्याची गॅरंटी. ईद हा सलमानचा आवडता मुहूर्त. आपला नवा चित्रपट ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला की तो सुपरहिट होणारच याची सलमानला खात्री असते. म्हणूनच प्रत्येक ईद सलमानसाठी यशाची नवी दालने खुली करते.
यावर्षी मात्र काही वेगळेच घडले. सलमानचा सिकंदर हा नवा कोरा चित्रपट ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. चित्रपटाची हीरोइन रश्मिका ही अवघी 28 वर्षांची आहे तर सलमान साठीकडे झुकला आहे. म्हणजेच सलमान विवाहित असता तर आज त्याला रश्मिकाच्या वयाची मुलगी असती. वयातील अंतराचे हे सत्य सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना सलमान आणि रश्मिका यांची जोडी जमविली गेली. रश्मिका हे सध्या चलती नाणं आहे. सलमान तर गेली तीन दशके सुपरहिट चित्रपट देतो आहे. या पार्श्वभूमीवर प्रेक्षक या जोडीला स्वीकारतील आणि सिकंदर सुपर डुपर हिट होईल असा निर्मात्यांचा अंदाज असावा. थोडक्यात त्यांनी प्रेक्षकांना गृहीत धरून ही जोडी बनविली असावी. अनेक चित्रपट नायक नाईकांच्या जोडीमुळे हिट ठरतात हा इतिहास आहे. पण हे नेहमीच घडते असे नाही. सिकंदर हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
ईदच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी सिकंदर प्रदर्शित झाला. पण तो बॉक्स ऑफिसवर आपली चमक दाखवू शकला नाही. माहितगार सांगतात की, सिकंदरच्या निर्मितीचा खर्च दोनशे कोटी रुपयांच्या घरात आहे. हा खर्च भागून नफा कमवायचा म्हटला तर सिकंदर ने किमान 400 कोटी रुपयांचा गल्ला जमविणे अपेक्षित होते. पण तसे घडताना दिसत नाही. चित्रपटाची सुरुवात पहिल्या दिवशी बऱ्यापैकी होती. दुसरा दिवस ईदचा असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर गर्दी जमणारच हे ठरलेले होते. घडले देखील तसेच. ईदचा सिकंदरला चांगला फायदा झाला. पण त्यानंतर सिकंदर आपली चमक दाखवू शकला नाही. पुढील काही दिवसात प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सिकंदरचे अनेक खेळ रद्द करावे लागले. सलमानच्या दृष्टीने हे अनपेक्षित आणि धक्कादायक होते. सिकंदरचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सलमान हा त्यांच्या प्रमोशन मध्ये मग्न झाला. या प्रमोशन मध्ये त्याच्या मदतीला इतर कुणी आल्याचे दिसले नाही. कदाचित लोकांना असे वाटले असेल की सलमानला मदतीची गरज नाही. तो स्वतःच्या खांद्यावर प्रमोशनचे ओझे लीलया पेलू शकतो. ते काही का असेना. इंडस्ट्रीतील लोकांच्या असहकारामुळे सलमान मात्र चांगलाच नाराज झाला असल्याचे समजते. माणूस कितीही यशस्वी असला तरी जीवनात प्रत्येकाला एकमेकांची गरज भासते. आज सलमान तीच भावना बोलून दाखवत आहे.
सिकंदरच्या कमाईच्या आकडे निराशा जनक आहेत. चौथ्या दिवशी तर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दहा कोटी रुपये देखील कमवता आले नाहीत. या चित्रपटाची चौथ्या दिवसाची कमाई फक्त रु ९.७५ कोटी होती. सिकंदरच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईत चौथ्या दिवशी 50 टक्क्यांनी घट झाली असल्याचे सांगण्यात येते.
मुकद्दर हा उर्दू शब्द आहे. मुकद्दर चा अर्थ भाग्य असा होतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे सिकंदर का मुकद्दर उसके साथ नही है. म्हणूनच मोठ्या अपेक्षा असलेला सिकंदर बॉक्स ऑफिसवर कोसळला आहे. यालाच जीवन ऐसे नाव आहे. सदा सर्वकाळ यशाची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. ज्याला हे समजते तो यशाने हुरळून जात नाही अथवा अपयशाने खचून जात नाही. जीवनातील अनेक चांगले गोड अनुभव गाठीशी असलेल्या अनुभव संपन्न सलमानला आम्ही हे सांगण्याची गरज नाही.
-नरेंद्र विश्वनाथराव वाबळे
9820152936