नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, भूमीहीन शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या जाऊनही अद्याप तिसऱ्या पिढीलाही स्वतःच्या जमीनीच्या हक्काचा पट्टा, सातबारा मिळाला नाही. त्यामुळे जिवती तालुक्यातील जमिनीची तातडीने संयुक्त मोजणी करावी. जमिनीवर ताबा असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावेत. गायरान जमिनीचा ताबा कायम करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
आज नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जिवती तालुका भूमीहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी समितीच्या प्रतिनिधींनी श्री. वडेट्टीवार यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी वडेट्टीवार यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वासही त्यांनी दिला. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी सरकारकडे केली. ६३ वर्षांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. सरकारने हा प्रश्न मार्गी लावून जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.