डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मेगा ब्लॉक रद्द करा : शिवसेना ठाकरे गटाची मागणी
Santosh Gaikwad
April 13, 2024 08:29 PM
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (१४ एप्रिल) शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे आंबेडकरी अनुयायी दाखल होत असतात. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती रविवारी आल्याने आणि रविवारी लोकलचा मेगाब्लॉक असल्याने लाखो अनुयायींना मेगाब्लॉकचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मेगाब्लॉकमुळे आंबेडकरी अनुयायींची गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी उपनगरीय भागात मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यानुसार, रविवार १४ एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान आणि हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान, दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून अनेक अनुयायी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या चैत्यभूमी येथे येत असतात. त्यामुळे दादर स्थानकापासून शिवाजी पार्क येथे जाणाऱ्या मार्गांवर अनुयायींची प्रचंड गर्दी असते.
रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने मेगाब्लॉक रद्द करावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, सचिव अनिल देसाई यांनी हा मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी एका पत्राद्वारे दोन्ही रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना केली आहे.
‘असा’ असेल मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १४ एप्रिल रोजी ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन धीमा मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तसेच, हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.