विधान परिषदेच्या शिक्षक - पदवीधर मतदारसंघासाठी ५५ उमेदवार निवडणूक रिंगणात
Santosh Gaikwad
June 12, 2024 10:59 PM
मुंबई, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून एकूण ८८ उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी ३३ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढील प्रमाणे : मुंबई पदवीधर मतदारसंघात ८ , कोकण विभाग पदवीधर १३, नाशिक विभाग शिक्षक २१, तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात १३ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.