लोकसभेचे रणशिंग फुंकणार : ठाकरे गटाचे आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन
Santosh Gaikwad
January 23, 2024 09:49 AM
नाशिक : शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा आज २३ जानेवारी जयंती. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला पराभूत करण्यासाठी नवनवीन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख वक्ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत ते नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उध्दव ठाकरे, बाळासाहेबांच्या लुकमध्ये दिसले
सोमवारी उद्धव ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले त्यावेळी शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी करीत त्यांचे जंगी स्वागत केले. ठाकरे यांनी सह कुटुंब काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवा कुर्ता परिधान केला होता. तसंच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या आणि कपाळावर भगवा टीळा लावला होता. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या लुकमध्ये दिसून आले. त्यांना पाहिल्यानंतर अनेकांना बाळासाहेबांची आठवण आली.