ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात ?

Santosh Gaikwad June 19, 2023 04:12 PM


मुंबई :  विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी  रविवारी  शिंदे गटात प्रवेश केला. आमदारांचे आऊटगोईंग थांबविण्यात ठाकरे गटाला सपशेल अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. आमदारांच्या गळतीमुळे शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळलं. अखेर भाजपने शिंदे गटाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. १०५ आमदार असलेल्या भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ ४० आमदार असलेल्या एकनाथ शिंदेच्या गळयात घातली. सध्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत तर विधानपरिषदेत ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील जागांची संख्या कमी होत असल्याने अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


विधान परिषदेतील सदस्य संख्या एकूण ७८ आहे त्यापैकी भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. तर २१ जागा रिक्त आहेत.  मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने विधान  परिषदेतील ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्याही ९ झाली आहे.  त्यामुळे ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. इतकेच नव्हे तर आता काँग्रेसदेखील ठाकरेंच्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा ठोकू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


विधानपरिषदेतील सध्याचं संख्याबळ

भाजप : २२

ठाकरे गट : ०९

शिंदे गट  : ०२

राष्ट्रवादी काँग्रेस : ०९

काँग्रेस : ०८

जनता दल युनायटेड : ०१

पीइंटस अॅण्ड वर्कस पार्टी ऑफ  इंडिया :  ०१ 

रासप : ०१

अपक्ष :  ०४

रिक्त जागा : २१

--------------------