किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटीचा आराखडा तयार : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Santosh Gaikwad
January 28, 2024 09:18 PM
सातारा दि. 28 : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन राज्य शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दुर्ग रायेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ पार ता. महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. महेश लांडगे, आ. नितेश राणे, संभाजी भिडे गुरुजी, उद्योजक भावेश भाटिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रायेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने या मंदिराला वेगळे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत आपण जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. त्यांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा यादृष्टीने अशा गडकोट मोहीमा महत्वाच्या आहेत, असे सांगून त्यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनाने प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रदीप बाफना यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब देसाई यांनी प्रास्ताविक केले. संजय जठार यांनी आभार मानले. मोहिमेमध्ये सहभागी करून पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.