मुंबई, दि. ५ः मुदत संपलेल्या १०८ रूग्णवाहिकेला मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिली. आरोग्यमंत्री याबाबत अनभिज्ञ असल्याचा मुद्दा उपस्थित करत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत चांगलीच कोंडी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील दानवेंच्या मुद्द्याला समर्थन देत, आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली.
निलंबनाच्या कारवाईनंतर दानवे यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या कामकाजात भाग घेतला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी १०८ रूग्णवाहिकेबाबत मुद्दा मांडला होता. आरोग्यमंत्र्यांनी १०८ रूग्णवाहिकेला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्याऐवजी १०२चा पर्याय देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी मुदतवाढीच्या प्रस्तावावर सही केली. आयुक्तांनी त्यानंतर ६ महिन्यांच्या मुदतवाढीचे पत्र काढले. आरोग्य विभागात आरोग्य मंत्र्यांचे ऐकले जात नाही का, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. उपसभापती गोऱ्हे यांनी दानवेंच्या मुद्द्याला पाठिंबा दिला. आरोग्य मंत्र्यांना ११ वाजता मुदतवाढ द्यायची नाही आणि १२ वाजता मुदतवाढ द्यायची असे वाटले असेल, असा चिमटा काढला.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावर खुलासा केला. १०८ रूग्णवाहिकेविषयी निवदेन केले, तेव्हा मंत्रालयातील कार्यालयातून संबंधित फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. शासन म्हणून संयुक्त निर्णय घेण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे मान्यता कशी मिळाली, हे माझ्यापर्यंत आले नव्हते. जी माहिती माझ्याकडे होती, त्यावर आधारित सभागृहात निवेदन केले, असे सावंत यांनी सांगितले.