दहावीचा निकाल ९३.८३ टक्के : कोकण अव्वल तर मुलींची बाजी !
Santosh Gaikwad
June 02, 2023 04:48 PM
मुंबई दि. 2 : बारावीच्या निकालानंतर लक्ष लागलेल्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला. दहावीचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल लागला आहे. बारावी प्रमाणेच दहावीतही मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी घटला आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.८७ इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.०५ इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे. दहावीच्या एकूण २५ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर २३ हजार १३ शाळांपैकी ६८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८९ हजार ४५५ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, तर ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ९३.८३ अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ६०.९० अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे. नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ८,३९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३१२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील ७,६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.४९ अशी उल्लेखनीय आहे.
विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.११ टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९२.०५ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात ९५.६४, औरंगाबाद विभागात ९३.२३, मुंबई विभागात ९३.६६, कोल्हापूर विभागात ९६.७३, अमरावती विभागात ९३.२२, नाशिक विभागात ९२.२२ आणि लातूर विभागात ९२.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.