घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरू !

Santosh Gaikwad May 14, 2024 06:26 PM


मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संबंध जोडून आरोपांची राळ उठवली आहे. मात्र, या दुर्घटनेला सत्ताधारी शिंदे सरकार कारणीभूत असल्याचे खापर शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्यांनी फोडत, सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ठाकरेंच्या शिवसेना आणि  शिंदेंच्या शिवसेनेने एकमेकांकडे बोट दाखवत धारेवर धरले असतानाच दुसरीकडे राज्य सरकारमधील  मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाजपवर शरसंधान साधले आहे.  

सोमवारी सोसाटयाच्या वा-यामुळे मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर ८० लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांनी होर्डिंग मालक भावेश भिंडे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे मातोश्रीवरील फोटो व्हायरल करून टीकास्त्र सोडले. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे सरकारला लक्ष्य केले. राज्यात अडीच वर्षापासून भाजप - शिंदेंचे सरकार आहे. तर मुंबई मनपात सध्या प्रशासक राज आहे. प्रशासकाच्या आडून बेकायदेशीर होर्डिंग साठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यामुळे घाटकोपर दुर्घटनेला शिंदे सरकार कारणीभूत आहे, असा आरोप राऊतांनी केला. नाशिक मनपातील ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा पुनरूच्चार केला. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

भुजबळांचे भाजप आमदाराला खडे बोल 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंचा काय संबंध ? असा प्रतिप्रश्न करत भाजप आमदार राम कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. भुजबळ म्हणाले की व्यापारी, धंदेवाईक लोक पुष्पगुच्छ किंवा मिठाई घेऊन भेटण्यासाठी येतात. फोटोही काढतात, अशावेळी लोकांना नाही म्हणून शकत नाही. अनेकदा फोटो काढणारा व्यक्ती कोण आहे? काय करतो? कार्यकर्ता आहे की नाही? याची तिळमात्र माहिती नसते. अशी लोक सगळ्यांसोबत फोटो काढत असतात. त्यामुळे फोटोवरून राजकारणासाठी ठाकरेंना दोष देणे योग्य नाही, अशा शब्दांत भुजबळांनी कदमांना खडेबोल सुनावले. तसेच या दुर्घटनेप्रकरणी दोषीला शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिका मांडली.
*****