'आपला देश बुद्धांचा, युद्ध आपला मार्ग नाही'; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा संदेश

Santosh Gaikwad August 15, 2024 05:19 PM


नवी दिल्ली:
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सलग ११ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. १५ ऑगस्ट रोजी देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले की, आपला बुद्धांचा देश आहे. युद्ध आपला मार्ग नाही. असा संदेश त्यांनी जगाला दिला. २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

  नरेंद्र मोदी  पुढे म्हणाले की, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. हा आपला सुवर्णकाळ आहे, माझ्या प्रिय देशवासियांनो ही संधी जाऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी केलं.

 मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीवरही प्रहार केले. राजकारणातील घराणेशाही नष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कमीत कमी एक लाख तरुण-तरुणींनी पुढे यावे. यामुळे राजकारणातील घराणेशाहीला आळा बसेल. या तरुणांनी कोणत्याही पक्षात जावे. कोणतीही निवडणूक लढवावी, असेही मोदी यांनी आवाहन केले. तसेच मोदी यांनी देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू करण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात म्हटले.  

अंतराळ क्षेत्रातही आपण आज अनेक बदल झाले आहेत. अंतराळ क्षेत्र हे आपल्या भविष्याशी जोडलेले आहे. अंतराळ क्षेत्र अनेक बंधनांनी जखडलेले होते. आता हेच बंधन मुक्त करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स येत आहेत. अंतराळ क्षेत्र हे भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. आज प्रायव्हेट सॅटेलाईट्स, रॉकेट्स लॉन्च होत आहेत. नीती, धोरण योग्य असेल तर तसेच संपूर्ण समर्पणाची तयारी असेल तर योग्य परिणाम दिसून येतात, असे मोदी म्हणाले.

वन नेशन वन इलेक्शन 
एक देश एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तुम्हाला येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींबाबत सरकारला उपाय सांगा असे आवाहन त्यांनी युवक प्राध्यापकांना केले. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो वा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांवर अत्याचार करणार्यांना फाशी 

आपल्या माता भगिनींवर होत असलेल्या अत्याचारामुळे जनतेत संताप आहे. ही चिंतेची बाब आहे. महिलांवरील गुन्ह्यांचा त्वरित तपास करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. त्यांना फाशी झाली पाहिजे. ही भीती निर्माण झाली पाहिजे असे मोदी म्हणाले.