सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. २४ सप्टेंबरला मुंबईत एक दिवसीय अधिवेशन !

Santosh Gaikwad September 18, 2023 04:11 PM


मुंबई : सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापनदिन व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी मुंबईत सत्यशोधक समाजाचे एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ‘शिवनेर’ व ‘श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री   सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

 उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव (मुख्य संपादक, पुढारी) हे उपस्थित राहणार असून, सन्माननीय अतिथी म्हणून प्रा. एस. व्ही. जाधव, माजी आमदार प्रकाश बापू शेंडगे आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड उपस्थित राहणार आहेत. आमदार भाई जयंत पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असतील.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात चंद्रकांत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादाचा विषय आहे : महात्मा फुले आणि महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही महत्त्वाचे का ? त्यात डॉ. भालचंद्र मुणगेकर, अ‍ॅड. शंकर निकम व विश्वास उटगी सहभागी होणार आहेत.

 दुपारी १.३० वाजता स्नेहभोजनानंतर दुसरे सत्र दुपारी २.३० वाजता सुरू होणार असून त्यात खुले अधिवेशन व सत्यशोधकी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  सायं. ५.०० वाजता चहापानाने या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

 मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या मुख्य सभागृहाला ‘पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव नगरी’ असे नाव देण्यात आले असून, सभागृहातील विचार मंचाला ‘शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे विचार मंच’ असे नाव देण्यात आले आहे.

 सर्वश्री नरेंद्र वि. वाबळे, विशाल विलासराव तांबे, अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज, राही भिडे आणि इंजि. रमेश देशमुख हे कार्यक्रमाचे निमंत्रक असून सत्यशोधकी विचारांच्या मंडळींनी या एक दिवसीय अधिवेशनास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रकांनी केले आहे.