इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७, अजूनही ७८ जण बेपत्ता
Santosh Gaikwad
July 22, 2023 09:18 PM
खालापूर : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. २२९ लोकांपैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही ७८ लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. रायगड जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडेदहा ते आकराच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. गावावर दरड कोसळली. या घटनेत गावातील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी ठाण मांडून होते. त्यामुळे बचाव कार्याला वेग आला होता. इर्शाळवाडीमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. एनडीआरएफकडून ढिगारा बाजुला करण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात देखील वाढ होत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत तसंच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे. तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेतून वाचलेल्या कुटुंबांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्यासाठी ६० कंटेनर मागवले आहेत, कायमचं पुनर्वसन करण्याआधी ही व्यवस्था करण्यात आलीय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या घटनेत आतापर्यंत २७ जणांनी आपला जीव गमावला आहे. अद्यापही काही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.