मुंबई, दि.२७ः मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या घरासाठी मुंबईत ५० टक्के आरक्षण मिळायलाच हवे. आमचे सरकार सत्तेत आल्यास, तातडीने या संदर्भातील निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लोढा टॉवरमध्ये ५० टक्के आरक्षण ठेवावे, असा टोला लगावला.
मुंबईसाठी मराठी माणसाने लढा दिला. रक्त सांडून मराठी माणसाने मुंबई मिळवली. त्यामुळे मराठी माणसाचा पहिला अधिकार मुंबईवर आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मराठी माणसांच्या घरासाठी ५० टक्के आरक्षण ठेवणार आणि तसा शासन निर्णय तातडीने घेऊ, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठी भाषा सक्तीची केली. दुकानांवर मराठी फलक सक्तीचे केले. गिरणी कामगारांना घर मिळावे, म्हणून आजही आग्रही आहोत. गद्दारी करुन सरकार पाडले नसते तर आम्ही मराठी माणसांच्या घरासाठी आरक्षण केलेच असते, असे ठाकरेंनी म्हटले. मुंबईत मराठी माणसाला घर मिळायलाच हवा. भाजपकडे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सारखे विकासक आहेत. मुंबई महानगर पालिकेतून कारभार चालवतात. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसासाठी त्यांनी ५० टक्के आरक्षण ठेवावे, असा टोला लगावला.
विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावर महायुती आणि महाविकास आघाडीत जुंपली आहे. महायुतीने आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, असे आव्हान दिले. ठाकरेंनी यावर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महायुतीतील पक्ष एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करत आहेत. त्यांच्यातील अपयशाचे धनी समोर येऊ दे, असा टोला लगावला. तसेच महाविकास आघाडीकडे महाराष्ट्र हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार देणार
उद्धव ठाकरे यांना ४२ आमदारांनी सोडून शिंदेंच्या सेनेत सामील झाले. विधान परिषदेतील नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरिया, किशोर दराडे, आमशा पाडवी यांनी ठाकरेंना रामराम केला. ठाकरेंकडे विधानसभेत १४ आण परिषदेत ६ आमदार आहेत. अशा स्थितीत विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. संख्याबळ कमी तरी उमेदवार निवडून इतक्या मताधिक्याचे गणित जुळले आहे. सोडून गेलेल्यांना पुन्हा सोबत घेणार नाही. मात्र, रणनिती आखली असून हालचालीही सुरु केल्याचे ठाकरेंनी सांगितले. त्यामुळे ठाकरे कशा प्रकारे मताधिक्य जुळवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे