देशात ५६.६८ टक्के मतदान : महाराष्ट्रात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान !

Santosh Gaikwad May 20, 2024 10:11 PM

मतदार यादीतून नावे गायब,  मतदारांमध्ये उदासीनता 

मुंबई, दि. २० :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान  पार पडलं. देशात एकूण ५६.६८ टक्के मतदान झालं. देशात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी ४८.६६  टक्के मतदान झाले आहे. मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे गायब असल्याने लाखो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.   

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. उष्णता अधिक असतानाही मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले होते. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर मतदार यादीत नावे नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्यामुळे मतदारांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. गेली अनेक वर्षे आम्ही मतदान करीत असताना यावेळी आमची नावे डिलीट कशी झाली असा सवाल मतदारांकडून विचारण्यात आला. तसेच मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत आढळून आली. एकाच कुटूंबातील अनेकांची नावे गायब झाली होती. ज्येष्ठ नागरिकांची नावे मोठया प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले. मतदार यादीत नावे नसल्याने अनेक मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचा दिसून आला. तसेच मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सेाय नसल्याने अनेक मतदारांनी संताप व्यक्त केला. मतदारांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. तसेच अनेक  ठिकाणी बोगस मतदान झाल्याचेही प्रकार घडले. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुटूंबासह ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्युन आयटी पार्क मधील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. उध्दव ठाकरे यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर तर राज ठाकरे यांनी दादर येथील मतदान केंद्रावर कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला. 

महाराष्ट्रासह काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला विलंब झाला हेाता त्यामुळे मतदानकेंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्या मतदारांना ६ नंतरही मतदान करण्यासाठी केंद्र सुरू ठेवण्यात आली हेाती मुंबई आणि नाशिकमध्ये मतदान केंद्रावर बराच गोंधळ पहायला मिळाला मुंब्रयात तर चार चार तास मतदारांना रांगेत उभे राहावे लागले त्यामुळे संध्याकाळी ७ नंतरही काही मतदारसंघात मतदान सुरू होतं. मुंबईतील कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिका-यांमध्ये राडा झाला होता तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना अर्धा ते पाऊणतास  ताटकळत रांगेत उभे राहावे लागले. 



कल्याणात सर्वात कमी ४१.७० टक्के मतदान 

राज्यातील मुंबईतील सहा मतदारसंघ तसेच भिवंडी नाशिक दिंडोरी धुळे ठाणे कल्याण आणि पालघर या १३ मतदार संघापैकी  कल्याण लोकसभा मतदार संघात सर्वात कमी ४१ ७० टक्के मतदान झालं तर दिंडोरीत सर्वाधिक ५७ ०६ टक्के मतदान झाले. कल्याणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवीत आहे त्यामुळे इथल्या निवडणुकडे विशेष लक्ष असतानाच कमी मतदान झाल्याने या ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  काही ठिकाणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं त्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. 
 
 महाराष्ट्रातील मतदान 

धुळे-  ४८.८१ टक्के
दिंडोरी - ५७.०६ टक्के
नाशिक - ५१.१६ टक्के
पालघर-  ५४. ३२ टक्के
भिवंडी-  ४८.८९ टक्के
कल्याण - ४१.७० टक्के
ठाणे - ४५.३८ टक्के
मुंबई उत्तर - ४६.९१ टक्के
मुंबई उत्तर मध्य - ४७.३२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व -  ४८.६७ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम - ४९.७९ टक्के
मुंबई दक्षिण - ४४.२२ टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ४८.२६ टक्के
----------
देशात झालेलं मतदान 

बिहार - ५२.३५
जम्मू काश्मीर -५४.२१
झारखंड - ५१.९०
लडाख - ६७.५०
महाराष्ट्र - ४८.६६
ओडिसा - ६०.५५
उत्तरप्रदेश -५५.८०
पश्चिम बंगाल - ७३
--------