बारदानाची ७ कोटीची विठ्ठल, दामाजी, कडे थकबाकी ! हैद्राबादच्या न्यायालयात अखेर वसुलीसाठी दावा
Santosh Gaikwad
August 28, 2024 12:00 PM
पंढरपूर (प्रतिनिधी):- देवाचे, संताचे नाव वापरून कारखाने काढायचे आणि कोट्यवधीची देणी थकवून व्यापार्यांना जेरीस आणायचे, शेतकर्यांचा हिताचा सर्रास विसर पाडून सहकारी कारखाने डबघाईला आणायचे, हे महाराष्ट्रात गेल्या काही दशकात घडत असून देवाच्या, संतांच्या, सहकार शिरोमणीच्या नावाला कलंकीत करण्याचे पाप राज्यातील नेते मंडळी करताना दिसून येत आहे. बारदानाचे ७ कोटीपेक्षा जास्त रक्कम थकल्याच्या कारणावरून हैद्राबाद येथील व्यापारी अजयकुमार सुशिलकुमार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर (पंढरपूर) दामाजी सहकारी साखर कारखाना (मंगळवेढा) तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चंद्रभागानगर यांचे विरुध्द हैद्राबाद येथील न्यायालयात वसुलीसाठी दावा दाखल केला आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या नावाने चंद्रभागानगर (भाळवणी) येथे सुरु करण्यात आलेल्या साखर कारखान्याविरोधात बारदाना थकबाकी प्रकरणी ३५ लाख १६ हजार ५१९ रुपयाचा दावा हैद्राबाद येथील व्यापारी अजयकुमार यांचे वतीने रामावतार अग्रवाल यांनी चिफ जज्ज सिटी सिविल यांच्या न्यायालयात ३ डिसेंबर २०२१ रोजी दाखल केला आहे. या दाव्यानुसार मुद्दल १८ लाख ६१ हजार १४५ रुपये तर व्याज १६ लाख ५५ हजार ३७४ रुपये वसुलीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी चेअरमन कल्याण काळे, व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे, एम.डी झुझार आसबे यांना पार्टी करण्यात आले. कारखान्यातर्फे न्यायालयात रक्कम देण्याचे कबुलकरण्यात आले , मात्र नंतर अद्याप दमडीही दिली नाही. अजयकुमार हे साखर कारखान्यांना शुगर बॅग, राईस बॅग, बेसीयन क्लॉथ, पीपी सॅक यांचा पुरवठा करतात. १०० किलो, ५० किलोचे थैले त्यांनी कारखान्यांना १९९८ पासून विक्री करत आहेत. मात्र २०१६ पासून थकबाकी वाढत गेली व कारखान्याने वर हात करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी हा दावा केला. अजून ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
संत दामाजीकडे तब्बल २ कोटी ३२ लाखाची थकबाकी -
मंगळवेढा ही पावनभुमी. या भूमीत संत दामाजींच्या नावाने पुढार्यांनी सहकारी साखर कारखाना काढला, मात्र संत दामाजी कारखाना विरोधात अजयकुमार यांचे मार्फत अमन अग्रवाल यांनी मार्च २०२४ मध्ये प्रिन्सीपल स्पेशल कोर्ट इन न दे केडर ऑफ डिस्ट्रीक्ट जज्ज फॉर ट्रायल अॅण्ड डिस्पोजल ऑफ कमर्शियल डिस्पुटस सीटी सीवील कोर्ट हैद्राबाद यांच्या न्यायालयात तब्बल २ कोटी ३२ लाख ८८ हजार १९४ रुपयाचा वसुली दावा दाखल केला आहे. यात मुद्दल १ कोटी १२ लाख १३ हजार २९८ रुपये असून मार्च २०२४ पर्यंतचे व्याज १ कोटी २० लाख ७४ हजार ९७६ रुपये एवढे आहे. वारंवार मागणी करून, कायदेशीर नोटीस बजावूनही चेअरमन, एम.डी., व्ही. चेअरमन यांचेसह जॉईंट डायरेक्टर (साखर) सोलापूर तसेच को.ऑप. सोसायटीचे कमिशनर ऑफ को.ऑप. रजिस्टार पुणे यांना देखील पार्टी करण्यात आले आहे.
विठ्ठल सह. साखर कारखान्याकडे तर ४ कोटी ७५ लाख थकबाकी -
विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. त्यांच्या नावाने काढलेल्या या कारखान्याकडे अजयकुमार यांचे बारदानाचे तब्बल ४ कोटी ७५ लाख ५८ हजार ३१३ रुपये थकबाकी असून त्यांचे वतीने अमन अग्रवाल यांनीच हैद्राबादच्या सीटी सिविल कोर्टाच्या प्रिन्सीपल सिवील कोर्टात मार्च २०२४ मध्ये वसुलीचा दावा दाखल केला आहे. गंमत म्हणजे या ४ कोटीत मुद्दल रक्कम ही १ कोटी ८२ लाख ५ हजार ३३ असून फेब्रुवारी २४ अखेरचे १८ टक्के दराने व्याज हे २ कोटी ९३ लाख ५३ हजार १८० एवढे आहे. मुद्दलापेक्षा व्याज जास्त झाले आहे. या दाव्यातही चेअरमन, व्हा. चेअरमन एमडीसह जॉईंट डायरेक्टर (शुगर) सोलापूर तसेच कमिशनर ऑफ को.ऑप. सोसायटी (पुणे) यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. २६ डिसेंबर २०२३ ला कायदेशीर नोटीस पाठवली. ई-मेल, पोस्टाद्वारे, समक्ष मागणी करूनही कोणीही सधी दखल घेतली नाही, त्यामुळे अखेर अजयकुमार यांनी दावा दाखल केला आहे.
‘विठ्ठल’ वर साखर घोटाळ्याचाही आरोप झालेले आहेत
सन २०२०-२०२१ या वर्षात रिकव्हरी कमी दाखवून २० कोटी ६६ लाखाची साखर परस्पर विक्री केल्याचा आरोपही चेअरमन व संचालकावर दोन वर्षापूर्वी करण्यात आला होता. अभिजित पाटील यांनी संचालक मंडळावर बरेच गंभीर आरोप केले होते. २६ एप्रिल २०२४ रोजी कारखान्याचे ३ गोडावून सिल करण्यात आले होते. कामगाराचे वेतन ठेकेदाराची बिले थकीत आहेत. शेतकर्याची एफआरपीची रक्कम वेळेवर वाटप नाही, असे अनेक अडचणी असून कारखाना डबघाईला आला आहे.
व्याजाचा भुर्दंड कोणावर ?
मुद्दलापेक्षा व्याज जास्त देण्याची पाळी संचालक मंडळाच्या चुकीमुळे कारखान्यावर येते. हा भुर्दंड कोणावर, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सहकारी कारखाने डबघाईला येतात मात्र तेच कारखाने लिलावात विक्री होवून कंपनी चालवायला घेते तेव्हा नफ्यात चालतात. मरतो तो सामान्य कर भरणारा माणुस आणि काबाडकष्ट करणारा शेतकरी. नेत्यांच्या कृतीमुळे शेतकरी, कर्मचारी आणि ठेकेदार अडचणीत येत असून नेते मंडळींना मात्र काहीच वाटत नाही. संतांचे नाव, देवाचे नाव घेवून राजरोस ही मंडळी आपले कारनामे सुरु ठेवतात. बाहेर राज्यात महाराष्ट्राची आणि देवाची, संतांची बदनामी होते, याचे देखील भान या मंडळींना नसते, हे दुर्दैवाने म्हणावे लागते.