ठाणे महापालिकेची मालमत्ता कराची वसुली ७११ कोटी

Santosh Gaikwad March 31, 2023 06:17 PM

ठाणे :  ठाणे शहरात विकासकामे मुलभूत सेवासुविधांबरोबरच ठाण्याच्या सौंदर्यीकरणामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानातंर्गत हाती घेतलेली विकास कामे पूर्णत्वास येत असून ठाण्याचे नवीन चित्र नागरिकांना अनुभवायला मिळत असून हे  निश्चितच नागरिकांनी कर रुपाने दिलेल्या प्रतिसादामुळे शक्य झाले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी  कोटी इतकी विक्रमी मालमत्ता कराची वसुली ३० मार्च रोजी म्हणजेच मार्च अखेर एक दिवस आधीच पूर्ण केली याबद्दल समस्त ठाणेकरांचे प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आभार व्यक्त केले आहेत.


  सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी रु. ७०५.२५ कोटी इतके सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. सध्या रु. ७११ कोटी इतका मालमत्ता कर संकलित झाला असून तो एकूण अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या सुमारे ९५  % इतका आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी ५९१ कोटी मालमत्ता कराची वसुली झाली होती.  यानुसार मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालमत्ता कराच्या संकलनामध्ये रु. ११५ कोटीची विक्रमी वाढीव वसुली झाली आहे. ठाणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ७०० कोटीचा आकडा महापालिकेने पार केला आहे.


यामध्ये मार्च २०२३ या एका महिन्यात  रु. ८३.४५ कोटी इतकी मालमत्ता वसुली झाली, पैकी १५ मार्च ते ३० मार्चपर्यत रु.५९.६० कोटी वसुली झाली. यापैकी ऑनलाईन पध्दतीने रु. १६६.१७ कोटी, धनादेशाद्वारे रु. ३४९.५६ कोटी, धनाकर्षद्वारे रु. १००.१६ कोटी, डेबीट कम एटीएम व क्रेडीट कार्ड पध्दतीने रु. २.०३ कोटी,  रोखीने रु. ९३.२२ कोटी इतकी वसुली झाली. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी  ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, ही योजना जास्तीत जास्त सोपी व सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.


  जे करदाते थकबाकी व पहिल्या सहामाहिच्या करासोबत दुसऱ्या सहामाही अशी  एकरकमी करभरणा महापालिकेकडे दिनांक १ एप्रिल २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या मालमत्ता करातील सामान्य करामध्ये  १० टक्के सूट तर दिनांक १६ जून २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत कर भरणाऱ्यांना ४ टक्के सूट, दिनांक १ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत कर भरणाऱ्यांना ३ टक्के तर  दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते दि. ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत २ टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी करदात्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपला मालमत्ता कर भरणेसाठी आवाहन करण्यात येत आहे.