ज्युबली कुमार !
Santosh Gaikwad
July 20, 2024 03:29 PM
ऐंशीच्या दशकातील ही गोष्ट आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. वसंत भालेकर मला राजेंद्रकुमार विषयी बोलताना म्हणाले होते, “राजेंद्रकुमार हा अतिशय व्यवहारी आणि हुशार माणूस आहे. त्याने भरपूर पैसे कमावले. पण ते इतर नटांप्रमाणे उधळले नाहीत. त्याने पैसे ठिकठिकाणी गुंतवून ते वाढविले.” भालेकरांचे म्हण्णे शंभर टक्के खरे होते. राजेंद्रकुमारचा चित्रपट म्हणजे हमखास सिल्वर ज्युबिली असे समिकरण जेव्हा ठरले होते तेव्हाच तो ज्युबिली कुमार म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याच्या सुपर हीट सिनेमांची यादी संपता संपत नव्हती. उदाहरणार्थः मेरे मेहबूब, मदर इंडिया, धूल का फूल, संगम, आरज़ू, दिल एक मंदिर, गूंज उठी शहनाई, क़ानून, ज़िंदगी, आई मिलन की बेला, हमराही, सूरज, आप आये बहार आयी, गीत, ससुराल… किती किती म्हणून नावे घ्यावी.
पण सुरुवात असते तेथे अंत देखील असतोच. १९६९ साली राजेश खन्नाचा ‘आराधना’ झळकला आणि सर्व रोमॅन्टीक हिरोंचे धाबे दणाणले. राजेंद्रकुमार देखील त्याला अपवाद नव्हता. त्याला सिनेमा मिळेनासे झाले. त्याची आर्थिक स्थिती इतकी खालावली की त्याला त्याचा आवडता ‘डिंपल’ बंगला विकावा लागला. तो राजेश खन्नानेच विकत घेतला. चाळीशी ओलांडलेला राजेन्द्रकुमार मग पून्हा पूर्वीचे यश मिळवू शकला नाही. पण ५०-६०च्या दशकांत मात्र तो जवान दिलों की धड़कन ठरला. बहारों फूल बरसाओ, ये मेरा प्रेम पत्र पढकर, मेरे मेहबूब तुझे मेरे मोहब्बत की कसम (रफी). जिसके सपने हमें रोज आते रहें (लता-महेंद्र कपूर), धीरे धीरे बोल कोई सून ना ले ( मुकेश-लता) पडद्यावरील त्याची ही गीते आजही ऐकत रहावीशी वाटतात.
दि. २० जुलै रोजी राजेंद्रकुमारची ९५ वी जयंती. त्याच्या रोमॅन्टीक आणि संगीतमय स्मृतीस विनम्र अभिवादन.
- नरेंद्र वि. वाबळे
९८२०१५२९३६