सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री; प्रशासन ठप्प, जनता वाऱ्यावर !
Santosh Gaikwad
June 05, 2023 04:36 PM
मुंबई : वर्षभरापासून अनेक विभागांना मंत्री नाहीत, एका-एका मंत्र्यांकडे सहा-सात खात्यांचा कारभार आहे तर सहा-सहा जिल्ह्यांना एकच पालकमंत्री आहे, यामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच औरंगाबादच्या सभेत मोदी-शहांचे हस्तक आहोत असे जाहीरपणे सांगितले आहे. आता ते दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेलेत अशी चर्चा आहे कारण दिल्लीला विचारल्याशिवाय यांचे पानही हलू शकत, राज्यकारभार करणे तर दुरची गोष्ट आहे. मंत्री कोणत्याच विभागाला न्याय देऊ शकत नाहीत. प्रशासन ठप्प असून कामकाज होत नाही त्यामुळे जनता त्रस्त आहे. लोकांची कामं होत नाहीत पण शिंदे-फडणवीस सरकारला त्याची चिंता नाही.
राज्यात आज अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे, शेतकरी हवालदिल आहे, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतमाल रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. पण शिंदे सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. मोठ-मोठ्या घोषणा करायच्या आणि केवळ इव्हेंटबाजी करुन जनतेच्या पैशाची लुट करण्याचे काम सुरु आहे. राज्यातील जनता शिंदे-फडणवीस सरकारला कंटाळली असून निवडणुकीत त्यांना घरी बसवेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.