मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला आहे. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची बोट जेटीच्या खांबांना जावून आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी सुद्धा उद्योग मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यावेळी तटरक्षक दलाने रेस्क्यू ॲापरेशन करत भर समुद्रातून सुटका केली होती. त्यानंतर आज मांडवा जेट्टीजवळ बोटीला अपघात झाला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजेही होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. दरम्यान, सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र नंतर बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.