आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार कल्याण निधीवाढीसाठी दोन दिवसात बैठक - उपमुख्यमंत्री अजित पवार
Santosh Gaikwad
July 15, 2024 11:42 PM
मुंबई : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा देण्यात येणाऱ्या सन्मान निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ११ हजार वरून २० हजार रुपये वाढ करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने आणि शंकराराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीत वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये १०० कोटींनी वाढ करावी अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. यावर सन्मान योजनेत वाढ करण्याच्या शासन निर्णयाची दोन दिवसात अंमलबजावणी आणि शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये वाढ करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्याच्या सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
वार्ताहर संघाच्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सरचिटणीस प्रवीण पुरो, सदस्य अलोक देशपांडे, खंडूराज गायकवाड, मनोज मोघे यांचा समावेश होता. वित्त विभागाचे अति. मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव सौरव विजय, सचिव ए. शैला, सचिव डॉ. ए. रामस्वामी यावेळी उपस्थित होते.