महाराष्ट्राला द्वेषपूर्ण वागणूक आदित्य ठाकरेंचे नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र
Santosh Gaikwad
June 18, 2024 06:42 PM
मुंबई, दि. १८ः पालघरमधील प्रस्तावित विमानतळ, छत्रपती संभाजीनगर विमानतळ, आणि नवी मुंबई विमानतळ नामांतरणांच्या रखडलेल्या मुद्द्यांकडे शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांना पत्र लिहून लक्ष्य वेधले. यावेळी भाजपने महाराष्ट्राला दिलेल्या द्वेषपूर्ण वागणुकीचा ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व केल्याने राज्याच्या भावनांची जाण आहे. त्यामुळे महाराष्ट्राला योग्य सन्मान मिळवून द्यावा, अशी मागणी उड्डाण मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
टीडीपी पक्षाच्या एनडीएतील समावेशाबाबत आदित्य यांनी उड्डाण मंत्र्याचे अभिनंदन करत राज्यातील विविध मुद्दे निदर्शनास आणून दिले. महाविकास आघाडीने केंद्राकडे छ. संभाजीनगर येथील छ. संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबईतील दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केले. केंद्राच्या मंजुरीसाठी हे प्रस्ताव पाठवून दिले. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी वारंवार मागणी केली. परंतु, भाजपने मागील चार वर्षात महाराष्ट्रात द्वेषपूर्ण राजकारण केल्याने हे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळाचा प्रस्ताव देखील लालफितीत अडकला आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला या विमानतळांमुळे आधार मिळेल. वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार केला. केंद्रातील तत्कालीन भाजप सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ठाकरेंनी पत्रातून केला आहे.
केंद्रात एनडीएचे सरकार सत्तेत आहे. टीडीपी या एका मजबूत प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या राम मोहन नायडू किंजरापू यांच्याकडे उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी आहे. एका राज्याच्या भावनांची आपल्याला जाण आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भावनांचा विचार करून प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय घेऊन राज्याचा सन्मान करावा, अशी विनंती ठाकरेंनी पत्रातून केली आहे.