मुंबई, दि. १ः महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना शिवसेनेकडून (ठाकरे) विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची रणनीती सेनेने आखली असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ६ जानेवारीला गिरगाव येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. शिवसेनेकडून देखील त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघात खासदार अरविंद सावंत निवडून आले आहेत. दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्याचा फायदा अरविंद सावंत यांना झाला. सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी भाजपकडून उमेदवार दिला जाणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे अरविंद सावंत विरोधात भाजप उमेदवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी शिवसेनेकडून (ठाकरे) केली जात आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी ठाकरे दक्षिण मुंबईत तयारी केली जात आहे. याआधी शाखानिहाय बैठका, लोकसभेचा आढावा, विधानसभानिहाय बैठका तसेच इतर कार्यक्रम देखील शिवसेनेने (ठाकरे) आयोजित केले होते. आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून ६ जानेवारी रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. गिरगांवातील विभाग क्रमांक १२ च्या वतीने ठाकरेंच्या सभेचे आयोजन केले आहे. लोकसभेच्या दृष्टीने ही सभा होणार असल्याने मोठ्या संख्येने शिवसैनिक या सभेला उपस्थित राहणार आहेत.