कृषी सेवा परीक्षेतील २०२ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत !
Santosh Gaikwad
February 28, 2024 04:39 PM
*कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या*
*विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मागणी*
मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २)-६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. यासर्व उमेदवारांची कागदपत्रे दिनांक १७ व १८ ऑगस्ट, २०२३ रोजी तपासून पूर्ण झालेली असूनही मागील ७ महिन्यापासून यांच्या नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत. या नियुक्त्या रखडल्यामुळे अकोला तसेच अनेक जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी या पदांचा पदभार द्यायला त्या दर्जाचे अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा पदभार खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन या २०२ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी श्री वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारकडून याबाबत सकारात्मक उत्तर देण्यात आले.
000000