अहमदनगर दि. 31 मे -पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.
चौंडी ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे,खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकताई राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर,अण्णासाहेब डांगे, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्याकाळात जमीन, महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने "नमो शेतकरी सन्मान योजना" सुरू केली असून केंद्र शासनाचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी तत्त्वावरील महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.