शरद पवारांना धक्का ! राष्ट्रवादी पक्ष आणि घडयाळ अजित पवार गटाकडे : निवडणूक आयोगाचा निर्णय
Santosh Gaikwad
February 06, 2024 08:22 PM
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडयाळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय दिल्याने शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला.
राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. जो न्याय शिंदेच्या शिवसेनेला दिला तोच निर्णय अजित पवारांच्या गटाला देण्यात आला असून निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिला. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र्य गट म्हणून मान्यता दिली आहे.
बुधवारी 4 वाजेपर्यंत नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना
अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना ही बुधवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे.
शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा
शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
अजित पवारांसोबत
- महाराष्ट्रातील ४१ आमदार
- नागालँडमधील ७ आमदार
- झारखंड १ आमदार
- लोकसभा खासदार २
- महाराष्ट्र विधानपरिषद ५
- राज्यसभा १
------------------------------
शरद पवारांसोबत
महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा - ३