१६ आमदारांच्या अपात्रतेवरून अजित पवार गट विरूध्द शिंदे गट सामना

Santosh Gaikwad July 10, 2023 08:59 PM

मुंबई :  एकीकडे राज्यात अजित पवारांची बंडखोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट याची चर्चा असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेचा निकाल प्रलंबित असताना त्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि नुकतेच अजित पवार यांच्यासमवेत सरकारमध्ये सामील झालेले नरहरी झिरवळ यानी प्रतिक्रिया दिली. मात्र, ही प्रतिक्रिया न रुचल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नरहरी झिरवळांना खोचक सल्ला दिला आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेवरून राष्ट्रवादी विरूध्द शिंदे गट सामना रंगल्याचे दिसून आले. 


विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीसच्या  पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले की, एकूण सगळ्या बाजूंचा जर विचार केला तर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होऊ शकतात. पण याबाबत अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही असं नरहरी झिरवळ यांनी माध्यमांना सांगितलं.


दरम्यान, नरहरी झिरवळ यांनी केलेला हा दावा शिंदे गटाचे आमदार आणि अपात्रतेची टांगती तलवार असणारे संजय शिरसाट यांनी मात्र नाकारला आहे. झिरवळांना मी सांगतो की त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नये. तुम्हाला जो अधिकार नाही, त्या अधिकारावर माणसानं बोलू नये, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.