अरूणाचल विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एन्ट्री

Santosh Gaikwad June 02, 2024 06:13 PM



मुंबई :  अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन जणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. तर, दोन उमेदवार कमी मतांच्या  फरकानं पराभूत झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यासह पक्षाचे प्रभारी मोहित पाटील आणि पूर्वोत्तर समन्वयक संजय प्रजापती यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ६० सदस्यांच्या विधानसभेत ४६ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळवले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसह राज्यातील ६० पैकी ५० विधानसभा जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. भारतीय जनता पक्षाने (भाजप) यापूर्वीच १० जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. मतदान झालेल्या ५० जागांपैकी भाजपने ३६ जागा जिंकल्या आणि मुख्यमंत्री पेमा खांडू हे  १० उमेदवारांपैकी एक आहेत जे बिनविरोध विजयी झाले आहेत.

भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. 'X' वर एका पोस्टमध्ये ते म्हणाले, “धन्यवाद अरुणाचल प्रदेश! या अद्भुत राज्यातील जनतेने विकासाच्या राजकारणाला स्पष्ट जनादेश दिला आहे. अरुणाचलमध्ये भाजपवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमचा पक्ष राज्याच्या विकासासाठी आणखी उत्साहाने काम करेल. 

मोदी म्हणाले, “अरुणाचलच्या भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात घेतलेल्या मेहनतीचे मला कौतुक करायचे आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राज्यभर जाऊन लोकांशी जोडले ते कौतुकास्पद आहे. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने पाच जागा जिंकल्या, तर अरुणाचलच्या पीपल्स पार्टीने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (एनसीपी) तीन जागा जिंकल्या आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. अरुणाचल प्रदेशमध्ये २०१९  च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकल्या होत्या.