एस टी महामंडळाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यातील बहुतेक सर्वच बस स्थानकातील बुक स्टॉल बंद!

Santosh Sakpal April 13, 2025 10:38 PM

 मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी

 ( मिलिंद काटे )

* अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रवाशांच्या सेवेसाठी  राज्यातील सर्वच जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी  बस स्थानके आणि बस आगारांची उभारणी करण्यात आली. आज रोज राज्यातील ४५  लाख प्रवासी  एसटी बसचा उपयोग करतात. साहजिकच त्यामुळे एखादा अपवाद वगळता राज्यातील सर्वच बस स्थानके प्रवाशांनी गजबजलेली असतात. आणि म्हणूनच प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकावर एसटी महामंडळाच्या प्रशासनाच्या वतीने काही गाळे तयार करण्यात आले. राज्य सरकारच्या स्तुत्य उपक्रमानुसार त्यातील एक गाळा हा पुस्तके व वृत्तपत्रांसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यामुळे प्रत्येक बस स्थानकावर  पुस्तकाचा स्टॉल उपलब्ध झाल्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हवे ते वृत्तपत्र, पुस्तक अथवा मासिक अगदी सहजपणे उपलब्ध होऊ लागले. विशेषता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्याचे मुखपत्र असलेले 'लोकराज्य', व ' शेतकरी'' हे प्रसिद्ध मासिके  किंवा केंद्र सरकारचे 'योजना ', आजकल, कुरुक्षेत्र  आदी सरकारी प्रकाशनांची  मासिके  आणि सामान्यज्ञानाची पुस्तके बस स्थानकावरील  बुक स्टॉल मधून सहजपणे उपलब्ध होत होती. याच बुक स्टॉल वरून स्थानिक आणि राज्य पातळीवरील विविध दैनिके आणि साप्ताहिके दिवसभर प्रवाशांना व  वाचकांना सहजपणे उपलब्ध होत होती. 

    परंतु आता एसटी महामंडळाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बस स्थानकावरील बुक स्टॉलचे गाळे भाड्याने घेऊन तेथे बुक स्टॉल चालवणे पुस्तक विक्रेत्यांना परवडत नाही. अशीच परिस्थिती बस स्थानकावरील कॅन्टीन आणि इतर दुकानांची आहे. महामंडळाच्या अवाढव्य भाड्यामुळे ही हॉटेल्स आणि स्टॉल्स धारक इतर व्यवसायकांशी स्पर्धेत टिकत नाहीत. परंतु कोणतीही सामाजिक आणि व्यावसायिक  जाणीव नसलेल्या एसटी महामंडळाच्या वाणिज्य विभागाने बस स्थानकावरील बुक स्टॉलच्या व इतर गाळ्यासाठी   आवाजाच्या सव्वा भाव आकारल्यामुळे  बुकस्टॉल च्या गाळ्याचे भाडे आणि वृत्तपत्र व पुस्तक विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांचे प्रमाण व्यस्त झाले होते, परिणामी तोट्यात गेलेल्या स्टॉल धारकांनी शहाणपणाचा निर्णय घेत आपले बुक स्टॉल बंद केले. त्यामुळेच   आज राज्यातील बहुतेक सर्वच बस स्थानकावरून बुक स्टॉल हद्दपार झालेले आहेत. 

    राज्यातील एसटी महामंडळाच्या मालकीच्या अनेक मोक्याच्या कितीतरी  जागा गाव पुढार्‍यांनी व काही मुजोर व्यवसायिकांनी  अतिक्रमण करून बळकावलेल्या आहेत.  तिकडे एसटी महामंडळाचे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. अनेकांचे तर तिथे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना तिकडे मुद्दामहून डोळे झाक करून  बस स्थानकावरील बुक स्टॉलना अवाजवी भाडे आकारून  हे स्टॉल बंद पाडण्याचे महान कार्य एस टी महामंडळाचे प्रशासन करत आहे, यामागील त्यांचा उद्देश अनाकलनीय असल्याचे मत अनेक वृत्तपत्र विक्रेते आणि वाचकांनी  व्यक्त केलेले आहे. एकीकडे अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेचं संवर्धन करण्याच्या मोठ मोठ्या गप्पा विद्यमान सरकारातील मंत्री मारत असताना दुसरीकडे  त्याच सरकारचे एसटी महामंडळ प्रशासन मराठी भाषेचे संवर्धन करणारे व वाचन चळवळीला ऊर्जा पुरवणारे  बस स्थानकावरील बुक स्टॉल बंद पाडण्याचे महापाप करताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण आणि प्रगल्भ विचारांचा, मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारा तडफदार मुख्यमंत्री लाभलेला असताना, तसेच एसटीशी संबंधित परिवहन खात्याला कितीतरी दिवसांनी प्रताप सरनाईक यांच्या  सारखा दूरदृष्टी असलेला कार्यक्षम असा तरुणतुर्क  मंत्री लाभलेला असतानाही  मराठी भाषा आणि साहित्य यांचे संवर्धन करण्याऐवजी त्यांची हेळसांड करणे ही खेदजनक बाब असल्याचे मत अनेक सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. मराठी वृत्तपत्रांची, मराठी मासिके आणि पुस्तकांची गळजीपी करणाऱ्या  एसटी महामंडळाच्या मुजोर प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर  पावले उचलण्याची अपेक्षा करत राज्यातील सर्वच्या सर्व बस स्थानकावर मराठी वाचन साहित्य विक्रीसाठी किमान एक गाळा हा बुक स्टॉल साठी राखीव ठेवून सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थी आणि वाचकांच्या वतीने करण्यात येत आहे.